चांगला रस्ता म्हणून वधुपित्याने मुलगी देण्यास दिला नकार
माय अहमदनगर वेब टीम
कान्हेगाव – गावात येण्यासाठी रस्ता चांगला नाही असे म्हणत वधू पित्याने मुलीला या गावात देणार नाही असा निर्णय घेतल्याने एका प्रतिष्ठीत घरातील मुलाचे लग्न रद्द करावे लागल्याने गावात एकच खळबळ उडाली आहे.
ही घटना आहे कोपरगाव तालुक्यातील पूर्वभागात असलेल्या कान्हेगावची. गत आठवड्यात गावातील प्रतिष्ठित व्यक्तीच्या मुलाला पाहण्यासाठी व लग्न जमावण्यासाठी वधु पित्याकडील काही पाहुणे मंडळी आली होती.
आलेल्या पाहुण्यांसोबत काही महिलाही होत्या. कान्हेगावकडे येणारे सर्वच रस्ते खूपच खराब आहेत. तसेच यावर्षी चांगलाच पाऊस झाल्याने होते ते खड्डे आणखी मोठे झालेले आहेत. येताना पाहुण्यांची गाडी खड्ड्यात आदळली त्यामुळे गाडीतील एका महिलेचे कंबर लचकले. मुलगा पाहण्याअगोदर रस्त्याचीच चर्चा सुरू झाली. चहापाणी झाला, पाहुणचारही झाला. मुलगाही पसंत झाला. परंतु ज्या पाव्हणीचे कंबर लचकले होते तिने मी या गावात मुलगी देणार नाही, गावात यायला धड रस्ता नाही तिथे मुलगी देणार नसल्याचे लावून धरल्याने बाकीच्यांनी काढता पाय घेतला.अखेर त्या महिलेच्या म्हणण्याला पुरुष वर्गानेही दुजोरा दिला. त्यामुळे एका उच्चशिक्षित नवर्यामुलाचे लग्न होता होता राहिले.
काही दिवसांपूर्वी याच रस्त्याने एका महिलेला प्रसुतीसाठी दवाखान्यात नेताना खराब रस्त्यामूळे बाळ पोटातच मृत पावले होते. त्याबाबत गटविकास अधिकार्यांना निवेदन दिले होते. जिल्हा परिषदेकडे निधी नाही असे उत्तर दिले जाते. गेल्या वीस वर्षांपासून ह्या रस्त्याचे काम झालेले नाही. शाळेच्या मुलांना, ग्रामस्थांना पायी चालणे ही कठीण झाले आहे. येथे असलेल्या गोदावरी बायोरिफायनरीज मुळे बाहेरून अनेक गाड्यांची ये जा नेहमीच चालू असते. वारीतील मुख्य रस्त्याची अवस्था तर अत्यंत दयनीय आहे. रस्त्यावर थोडा पाऊस झाला तरी गाळच गाळ होतो. याकडे कोणी लक्ष देईल की नाही हे सांगता येत नाही. या खराब रस्त्यामुळे एकाचे लग्न मोडलं हे मात्र खरं.
Post a Comment