अहमदनगर - संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानाची अंमलबजावणी, प्रसिध्दी, तपासणी, दौरे आणि बक्षीस योजना सन 2019-20 साठी राज्यातील 34 जिल्ह्यांसाठी 30 कोटी 64 लाख, 82 हजार रुपयांचा निधी मंजूर केला आहे. हा निधी जिल्हा परिषदांना प्राप्त होणार आहे. त्यात नगर जिल्ह्याच्या वाट्याला 1 कोटी 44 लाख, 32 हजारांचा निधी मिळणार आहे. त्याचा लाभ 1312 ग्रामपंचायतींना होणार आहे.
बहुतांश आजार हे अशुद्ध पाणी, अस्वच्छ परिसर आणि वैयक्तिक स्वच्छतेचा अभाव यामुळे होतात हे लक्षात घेऊन शासनाने 2000-01 पासून संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान राबविण्यास सुरुवात केली. प्रचंड लोकसहभागाने या चळवळीला लोकचळवळीचे रूप दिले, एवढेच नाही तर कोट्यवधी रुपयांची विकास कामेही लोकसहभागातून करण्यात आली. शुद्ध आणि सुरक्षित पिण्याचे पाणी, घराची स्वच्छता आणि अन्नाची काळजी, वैयक्तिक स्वच्छता, परिसर स्वच्छता, सांडपाण्याचे नियोजन आणि घनकचर्याचे व्यवस्थापन, मानवी मल-मूत्राची विल्हेवाट यासारख्या विभागात काम करून गावांनी अतिशय उत्स्फूर्तपणे ग्रामविकासाचा पाया मजबूत केला.
गावातील विद्यार्थी असो की अंगणवाडी सेविका-मदतनीस, सरपंच असो की महिला भगिनी, सर्वांनी या योजनेत भरीव योगदान तर दिलेच, परंतु गावाच्या सामाजिक तसेच आर्थिक विकासाला गती ही दिली. स्वखुषीने स्वच्छता दूत म्हणून काम करणार्या या सर्व लोकांनी गावागावात स्वच्छतेची ग्राम-धून निर्माण केली. पुढे सरकारने स्वच्छग्राम स्पर्धेतर्गत प्रत्येक ग्रामपंचायतीतील उत्कृष्ट प्रभागाला व जिल्हा परिषद गटस्तर, जिल्हापरिषद स्तर, विभागीय आणि राज्यस्तरावर पात्र ग्रामपंचायतींना पुरस्कार देण्यात येतात. या अभियानाची अंमलबजावणी, प्रसिध्दी, तपासणी, दौरे आणि बक्षीस योजना सन 2019-20साठी राज्यातील 34 जिल्ह्यांसाठी 30 कोटी 64 लाख, 82 हजार रूपयांचा निधी मंजूर केला आहे. त्यात नगर जिल्ह्याच्या वाट्याला 1 कोटी 44 लाख, 32 हजारांचा निधी मिळणार आहे. यात जिल्ह्यातील 1312 ग्रामपंचायतींना उत्कृष्ट प्रभागास देण्यात येणारी रक्कम, उत्कृष्ट प्रभाग पुरस्कार वितरण सोहळ्याचा समावेश आहे.
Post a Comment