खडसे-पवारांमध्ये गुफ्तगू
माय अहमदनगर वेब टीम
नवी दिल्ली - पक्षांतर्गत कारस्थानामुळे नाराज असलेले भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी सोमवारी दिल्लीत येऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. सुमारे अर्धा तास या दोन्ही नेत्यांमध्ये खलबते झाली.
पवार यांची भेट घेतल्यानंतर खडसे आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर जावून भेट घेणार असल्याने खडसेंच्या या भेटीगाठींबाबत राजकीय वर्तुळात तर्क-वितर्क वर्तविले जात आहेत.
विशेष म्हणजे खडसे दिल्लीत भाजप नेत्यांना भेटायला आले होते. त्यांनी दिल्लीत पोहोचल्यावर तसे सांगितलंही होते. पण भाजप नेत्यांऐवजी पवारांचीच भेट घेऊन ते परतत असल्याने राजकीय चर्चांना अधिक उधाण आले आहे.
भाजपचे महाराष्ट्र प्रभारी भूपेंद्र यादव आणि इतर भाजप नेत्यांची भेट घेण्यासाठी दिल्लीत आल्याचे खडसे यांनी सांगितले होते. पण या नेत्यांना भेटण्याऐवजी त्यांनी शरद पवार यांची भेट घेऊन त्यांच्याशी 35 मिनिटे चर्चा केली.
भाजपकडून होणारी उपेक्षा आणि भाजप नेत्यांकडून विधानसभा निवडणुकीत झालेले कटकारस्थान यामुळे खडसे नाराज आहेत. पक्षातील या नेत्यांची तक्रारही त्यांनी भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली होती.
या तक्रारीनंतरही संबंधित नेत्यांविरोधात कारवाई न करण्यात आल्याने खडसे प्रचंड नाराज आहेत. या नाराजीतूनच त्यांनी आज दिल्लीत भाजप नेत्यांऐवजी पवारांची भेट घेतल्याचं सांगण्यात येते.
या भेटीनंतर एकनाथराव खडसे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधून सरकारी कारणास्तव ही भेट घेतल्याचे सांगितले. जळगाव जिल्ह्यातील धरणांचे प्रश्न प्रलंबित आहे.
त्याच्या संदर्भात पवारांची भेट घेतली. ही भेट 35 मिनिटाची होती. पण पवार हे एका बैठकीत असल्याने त्यांची 20 मिनिटे वाट पाहण्यात गेली. त्यामुळे आम्ही फक्त 12 ते 15 मिनिटेच भेटलो. या भेटीत संबंधित प्रकल्पावर चर्चा करण्यात आली. कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. पवारांनीच रोहिणी खडसे यांच्या पराभवाची चौकशी केली. त्यावेळी त्यांना पक्षांतर्गत राजकारणाचा फटका बसल्याचे सांगितले, असे खडसे म्हणाले.
दरम्यान, पवारांची आज भेट घेतल्याने या प्रकल्पासंदर्भात उद्या संध्याकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुंबईत बैठक घेण्यात येणार असल्याचंही त्यांनी माध्यमांना सांगितले.
खडसे भाजपमध्ये नाराज आहेत. त्यांनी आपली नाराजी जाहीररीत्या बोलूनही दाखवली आहे. दरम्यान ते पक्ष सोडणार असल्याचीही चर्चा रंगू लागली, पण त्यांनी ही शक्यता फेटाळून लावली. शरद पवार यांच्याशी माझे जुने संबंध आहेत. त्यांना भेटायचे असले तर मी जाऊ शकतो असे विधान त्यांनी केले.
खडसे यांची भाजपला सोडचिठ्ठी ?
गेल्या पाच वर्षांचा हिशोब आता पूर्ण करणार हे त्यांनी आज केलेल्या टीकेवरून स्पष्ट झालेले असतानाच खडसे आता पक्षात राहूनच देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या समर्थकांवर वार करत राहणार की टोकाची भूमिका घेत पक्षालाच सोडचिठ्ठी देणार, अशी चर्चा आज राजकीय वर्तुळात रंगली होती.
खडसे यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप झाल्यामुळे त्यांचा राजीनामा घेण्यात आला. मात्र इतर अनेक मंत्र्यांना आरोप झाल्या झाल्या क्लीन चिट देणार्या देवेंद्र फडणवीस यांनी खडसे यांना कधीच परत मंत्री होऊ दिले नाही.
त्यातच निवडणुकीत त्यांचे तिकीटही कापले. खडसे यांच्या राजकीय कारकीर्दीसमोरच प्रश्नचिन्ह लावणार्या फडणवीस यांचा राजकीय हिशोब चुकता करण्यास आता खडसे कोणतीही कुचराई करणार नाहीत, असे त्यांच्या समर्थकांमध्ये बोलले जात आहे. मात्र हा हिशोब ते पक्षात राहूनच चुकता करणार की पक्षाला सोडचिठ्ठी देऊन करणार याबाबत आता उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.
अंधारात निर्णय घेणार नाही
भाजपला सोडचिठ्ठी देण्याच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांची भेट घेतलीय का? असा सवाल खडसेंना विचारण्यात आला. त्यावर मी अंधारात निर्णय घेणारा नाही.
निर्णय घेताना तुम्हाला सांगून आणि पत्रकार परिषद घेऊनच निर्णय घेईन, असे खडसे म्हणाले. भाजपमध्ये गेल्या काही दिवसांपासून नाराज असलेले माजी मंत्री एकनाथराव खडसे उद्धव ठाकरेंना भेटणार आहेत. उद्या संध्याकाळी उद्धव ठाकरे आणि खडसे यांची भेट होणार आहे.
पंकजा मुंडे भाजपाच्या बैठकीला गैरहजर !
औरंगाबादमध्ये भाजपची विभागीय आढावा बैठक झाली पण यासाठी भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे या गैरहजर होत्या. पंकजा मुंडे या भाजपवर नाराज आहे. त्यामुळे त्यांनी या बैठकीकडे पाठ फिरवली असल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू आहे. यावर खुलासा करतांना प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांनी सांगितले की पंकजांशी माझे बोलणे झाले असून त्यांची तबेत ठिक नसल्याने या या बैठकीला येणार नाहीत. दोन दिवसात परळीत त्यांच्याशी चर्चा करण्यात येणार आहे. पंकजांच्या नाराजीचा प्रश्नच येत नाही.
Post a Comment