दोन खुनांनी हादरली उपराजधानी




माय अहमदनगर वेब टीम
नागपूर - उपराजधानीतील गुन्हेगारांवर पोलिसांचा आणि कायद्याचा कसलाही वचक राहिलेला नसल्याचे गेल्या चोविस तासांत घडलेल्या दोन खुनांच्या घटनांनी सिद्ध करून दाखविले आहे. शहरापासून अवघ्या काही किलोमिटर अंतरावरील कामठी परिसरात एकाचा खून करून मृतदेह उघड्यावर फेकून देण्यात आला. या तरुणाची ओळख अद्याप पटू शकलेली नाही. तर पाचपावलीत दुचाकीच्या धडकेवरून आपसात भिडलेल्या दोन गटांत एकाला जीवे मारण्यत आले.
शुभम सदावर्ते (१८) रा. बावरी विहिरीजवळ, चकना चौक असे पाचपावली परिसरातील खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून ९ जणांना रात्री उशीरापर्यंत अटक करण्यात आली. पिंटू सुरेश बेंडेकर, जितेश सुरेश बेंडेकर, आकाश माहुरे, बादल नरेश पडोळे, मंगेश ऊर्फ बजरंगी चिरोडकर, सुशांत ऊर्फ लल्ला सोनकुसरे, विक्की बुटऱ्या, आकाश बुटऱ्या, विक्की ऊर्फ कावळा, यश ऊर्फ दौला आणि कृष्णा अशी आरोपींची नावे आहेत. शुभम हा मित्र पियुष आगडे याच्यासह मंगळवारी आपल्या दुचाकीने बांग्लादेश परिसरातून जात होता. त्यावेळी आरोपी पायी येत होते. यावेळी दुचाकीचा कट आरोपींना लागला. त्यावरून त्यांच्यात भांडण झाले व हाणामारी झाली. या घटनेचा वचपा काढण्यासाठी आरोपींनी गुरुवारी रात्री १० वाजेच्या सुमारास शुभम व त्याच्या मित्राला एका मैदानाजवळ गाठले व त्यांना लोखंडी रॉड, लाकडी दंडुक्याने मारहाण केली व पळून गेले. यात शुभम यांना गंभीर दुखापत झाली. पियुषही जखमी झाला. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण, उपचारापूर्वीच शुभमचा मृत्यू झाला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर नगराळे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक निरीक्षक रिजवान शेख, उपनिरीक्षक मनीष गोडबोल यांनी गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली.
दुसरी खुनाची घटना नवीन कामठी पोलीस ठाण्यांतर्गत समोर आली. नवीन कामठी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नागपूर-जबलपूर महामार्गावर असलेल्या नेरी शिवारात गुरुवारी सकाळी ११ वाजता एका इसमाचा मृतदेह सापडला. इसमाचा धारधार शस्त्राने खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी त्याचा मृतदेह धर्मराज चकोले यांच्या शेतात जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. मृतदेहाची ओळख अद्याप पटलेली नसून सहाय्यक निरीक्षक रातरत्न बन्सोड व पोलीस निरीक्षक संतोष बाकल यांच्या मार्गदर्शनात खुनाचा गुन्हा दाखल केला. मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी पत्रक जाहीर केले आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post