झेडपी, जिल्हा बँकेतील सत्तेसाठी कामाला लागा
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर – लवकरच जिल्हा परिषद पदाधिकारी आणि जिल्हा बँकेची निवडणूक होत आहे. याठिकाणी सत्ता स्थापन करण्यासाठी आतापासून कामाला लागा. यासह जिल्ह्यातील अन्य सहकारी संस्था, महापालिका, नगरपालिकांमध्ये राज्याप्रमाणे महाआघाडीसाठी अनुकूल वातावरण आहे. याठिकाणी सत्ता स्थापन करण्यासोबत पक्षासाठी काम करणार्या, वेळ देणार्या कार्यकर्त्यांना संधी देण्यात येईल, असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आ. दिलीप वळसे पाटील यांनी केले.
जिल्ह्यातील नवनिर्वाचित आमदारांच्या सत्कार समारंभात वळसे बोलत होते. यावेळी पक्षनिरीक्षक अंकुश काकडे, आ. अरुण जगताप, आ. संग्राम जगताप, आ. आशुतोष काळे, आ. प्राजक्त तनपुरे, आ. डॉ. किरण लहामटे, आ. नीलेश लंके, माजी आ. नरेंद्र घुले, चंद्रशेखर घुले, पांडुरंग अभंग, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, युवकचे जिल्हाध्यक्ष कपिल पवार, कार्याध्यक्ष संजय कोळगे, जिल्हा परिषदेचे सभापती उमेश परहर, महिला जिल्हाध्यक्षा मंजुषा गुंड, निर्मला मालपाणी, अॅड. शारदा लगड, माधवराव लामखडे, राजेंद्र गुंड, दत्तात्रय वारे, अविनाश आदिक, अनुराधा आदिक, जिल्हा परिषद सदस्य धनराज गाडे आदी उपस्थित होते.
वळसे म्हणाले, श्रीगोंदा आणि पाथर्डी मतदारसंघात थोडी गडबड झाली. या ठिकाणी आणखी वेगळे चित्र असते. भाजपकडून निवडणुकीपूर्वी विरोधी पक्षांना भिती दाखविण्यात आली. मात्र, शरद पवार यांच्या दौर्यानंतर परिस्थिती बदलली. पाऊस आणि ईडी राष्ट्रवादीच्या मदतीला धावून आली. जिल्ह्यात महाआघाडीचे नऊ आमदार विधानसभेच्या सभागृहात असून या तरूण आमदारांनी आता कामाला लागावे, पूर्ण वेळ सभागृहात हजेरी लावावी. आपल्या मतदारसंघापूरते मर्यादित न राहता राज्याचा विचार करून काम करावे. याच सोबत पराभव झालेल्या मतदारसंघाचे पालकत्व स्विकारून त्या ठिकाणी सामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवावेत.
जिल्हा परिषदेत पदाधिकारी निवडी आणि त्यानंतर दोन ते तीन महिन्यांनी जिल्हा बँकेची निवडणूक होत आहे. त्या ठिकाणी सत्ता स्थापन करण्यासाठी जिल्ह्यातील नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी आतापासून तयार करावी, असे आवाहन केले. जिल्हा परिषदेतील महाविकास आघाडीच्या सत्तेबाबत प्राथमिक चर्चा झाली असून लवकरच निर्णय घेण्यात येईल. कामे न करणार्या आणि नावासाठी पदे घेणार्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश त्यांनी जिल्हा पदाधिकार्यांना दिले. पक्षासाठी वेळ देणार्या प्रामाणिक कार्यकर्त्यांना जिल्हा परिषदेसह अन्य सत्तेच्या ठिकाणी पद देण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिली.
राज्यावर साडेसात लाख कोटींचा बोजा
भाजप सरकारने राज्यावर 7 लाख 50 हजार कोटींचा बोजा करून ठेवला आहे. यामुळे सरकारला दरवर्षी 38 ते 40 हजार कोटी व्याजापोटी अदा करावे लागत आहेत. अशा परिस्थितीत आघाडी सरकारला सर्वसामान्यांच्या गरजांसोबतच विकास कामे पूर्ण करावी लागणार आहेत.
महिनाभरात सर्व सुरळीत
नागपूर अधिवेशनानंतर सर्व काही सुरळीत होणार आहे. त्यानंतरच मंत्रिमंडळ विस्तार होणार असून सरकारची रचना पूर्णत्वास येणार आहे. तसेच सत्तेतील तिनही पक्ष आपल्या पक्षाचे ध्येय धोरण कार्यकर्त्यांना समजावून सांगणार असून त्यानुसार काम करणार असल्याचे आ. वळसे यांनी स्पष्ट केले.
वळसे यांना मंत्रिमंडळात घ्या – ठराव
राष्ट्रवादीच्या सत्कार समारंभात ज्येष्ठ नेते तथा जिल्हा निरिक्षक अंकुश काकडे यांनी आ. दिलीप वळसे यांना महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळात घ्यावे आणि त्यानंतर आ. वळसे यांनी जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या सहा आमदारांपैकी एका आमदाराला मंत्रीपद मिळवून द्यावे, असा ठराव मांडला. त्यास आवाजी अनुमोदन देण्यात आले. कार्यक्रमानंतर आ. वळसे यांनी या ठरावाबाबत असहमती दर्शविली.
रोहित पवार यांची दांडी
विधानसभा निवडणुकीनंतर जिल्हा राष्ट्रवादीने आयोजित केलेल्या कार्यक्रमाला आ. रोहित पवार गैरहजर होते. याबाबत आ. वळसे यांना विचारणा केली असता, त्यांनी पूर्व परवानगी घेतली असून कौटूंबिक कार्यक्रमामुळे ते हजर राहू शकले नाही, असे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
‘त्या’ सम्राटांना धडा
नगर लोकसभेची जागा पक्षाने आधी जाहीर केली असती, तर आज ती जागा जिंकली असती. जिल्ह्यातील गर्व झालेल्या सम्राटांनी संपत्ती आणि साधनांच्या जोरावर बारा शून्यची गर्जना केली. मात्र, मतदारांनी सामान्य जनतेचे प्रतिनिधीत्व करणार्या नीलेश लंके आणि किरण लहामटे यांना विजयी केले. हा त्या सम्रांटासाठी धडा असल्याचे आ. वळसे म्हणाले.
Post a Comment