अफगाणिस्तानात दहशतवादी संघटनेकडून सुरक्षा दलांवर हल्ला ; २६ ठार


माय अहमदनगर वेब टीम
काबूल- तालिबान या दहशतवादी संघटनेने उत्तर अफगाणिस्तानमध्ये नव्याने हल्ले करताना सुरक्षा दलांच्या जवानांना लक्ष्य केले. या हल्ल्यांत किमान २६ जवान ठार झाल्याची माहिती स्थानिक अधिकाऱ्यांनी बुधवारी दिली. तालिबानने या हल्ल्यांची जबाबदारी स्वीकारली आहे.

उत्तरेकडील कुंडुझ प्रांतातील दाष्टी आर्ची जिल्ह्यात एका पोलिस तपासणी नाक्यावर मंगळवारी रात्री झालेल्या हल्ल्यात १० जवान ठार, तर ४ जण जखमी झाले, अशी माहिती या प्रांताच्या परिषदेचे प्रमुख मोहम्मद युसुफ अयुबी यांनी दिली. बाल्ख प्रांतात तालिबानने पोलिसांच्या तपासणी नाक्यावर केलेल्या हल्ल्यात ९ अधिकारी ठार झाले. तपासणी नाक्यावरील चार पोलिस कर्मचारी बेपत्ता आहेत, अशी माहिती प्रांताच्या परिषदेचे प्रमुख मोहम्मद अफझल हादिद यांनी दिली. तालिबानचा प्रवक्ता झबिउल्लाह मुजाहिद याने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. तिसरा हल्ला ताखार प्रांतात झाला. प्रांताच्या गव्हर्नरचे प्रवक्ता जवाद हाजिरी यांनी सांगितले की, तालिबानशी झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांचे ७ जवान ठार झाले. प्रत्युत्तराच्या कारवाईत तालिबानच्या १० दहशतवाद्यांना ठार मारण्यात आले. ही चकमक दरकाद जिल्ह्यात उडाली. सुरक्षा दलांनी गेल्या आठवड्यात या भागातील अनेक प्रांतांतून तालिबानी दहशतवाद्यांना हुसकावून लावले होते. ही चकमक अजूनही सुरूच आहे, असे हाजिरी यांनी सांगितले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post