विनयभंग केल्याप्रकरणी 4 वर्षाची शिक्षा व 50 हजारांचा दंड
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर- अतुल आयरिंग भोसले (वय 26, रा. गुंडेगाव, ता. नगर ) याला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश यांनी अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्या प्रकरणामध्ये दोषी धरून 4 वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा व 50 हजार रूपये दंड अशी शिक्षा सुनावली.
पारनेर तालुक्यातील शहाजापुर परिसरातील एक अल्पवयीन मुलगी घरी एकटी असताना अतुल भोसले याने तिला माझ्या बरोबर पळुन चल, मला तु फार आवडतेस? असे म्हणत तुझ्या नावावर मी पैसे टाकतो, तसेच तुझा भाऊ, आई असे कोणी मध्ये पडल्यास त्यांना जीवे ठार मारीन अशी धमकी देत तिला लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य करून तिचा विनयभंग केला. ही घटना 18 सप्टेंबर 2018 रोजी घडली होती.
याप्रकरणी अल्पवयीन मुलीच्या नातेवाईकांनी दिलेल्या फिर्यादीवरून सुपा पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
याप्रकरणी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश यांच्या कोर्टात खटल्याची सुनावणी झाली. सरकार पक्षातर्फे 6 साक्षीदार तपासण्यात आले. यामध्ये पिडीत मुलगी, ग्रामसेवक व तपासी अधिकारी यांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या. सरकारी पक्षाचा युक्तीवाद व आलेला पुरावा ग्राह्य धरून न्यायालयाने अतुल भोसले यास दोषीला ग्राह्य धरून 4 वर्षांची सक्तमजुरी व 50 हजार रूपये दंड. दंड न भरल्यास 3 महिन्यांची सक्तमजुरी अशी शिक्षा ठोठावली आहे. दंडाची रक्कम पिडीत मुलीला देण्याचे आदेशही यावेळी देण्यात आले आहे. या खटल्यात सरकार पक्षाच्यावतीने अॅड. मोहन कुलकर्णी व अतिरिक्त सरकारी वकील एस.जी. पाटील यांनी काम पाहिले. पैरवी अधिकारी म्हणुन सहाय्यक फौजदार लक्ष्मण काशिद यांनी सहकार्य केले.
Post a Comment