धक्कादायक : देशात प्रत्येक दिवशी ९१ बलात्कार


माय अहमदनगर वेब टीम
नवी दिल्ली : नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोने (एनसीआरबी) गुरुवारी देशभरातील गुन्हेगारीची आकडेवारी जाहीर केली आहे. त्यानुसार सन २०१८ मध्ये ५०,७४,६३४ दखलपात्र गुन्हे घडले आहेत. तर २०१७ च्या तुलनेत २०१८ मध्ये १.३ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

सन २०१७ मध्ये दखलपात्र गुन्ह्यांची संख्या ५०,०७,०४४ होती. २०१७ साली गुन्हेगारीचे प्रमाण प्रति लाख लोकसंख्येला ३८८.६ होते. तर २०१८ मध्ये कमी होऊन ३८३.५ झाले आहे. २०१८ सालच्या क्राईम रेकॉर्डनुसार भारतात दरदिवसाला ८१ खून, २८९ अपहरण, ९१ बलात्काराचे सरासरी गुन्हे घडले आहेत.

यापूर्वी एनसीआरबीने अलीकडेच २०१७ साली घडलेल्या गुन्हेगारीचा अहवाल जाहीर केला होता. त्यानुसार सन १९९२ नंतर हत्येचे प्रमाण हळूहळू कमी झाले. सन १९६३ नंतर २०१७ मध्ये कमी प्रमाण नोंदविण्यात आले. त्यानुसार, एक लाख लोकसंख्येला २.४९ खून नोंदविण्यात आले. २०१५ च्या तुलनेत २०१७ मध्ये चोरीच्या घटनांमध्येही घट झाली आहे. तसेच २०१५ च्या तुलनेत २०१७ साली नोंद झालेल्या बलात्कार आणि लैंगिक शोषणाच्या घटनांची नोंद देखील कमी आहे.

अपहरणाचे गुन्ह्यात २०१८ साली १०.३ टक्क्यांनी वाढ झाली असून १०५७३४ एफआयआर दाखल करण्यात आले आहे. त्यापैकी ६३३५६ (१५२५० मुले आणि ४८१०६ मुली) लहान मुले तर ४११८० एफआयआर (९४१५ पुरुष, ३२७६५ महिला) हे १८ वर्षावरील सज्ञान व्यक्तीचे अपहरण केल्याप्रकरणी नोंद आहेत.

महिलांविरोधातील गुन्ह्यांची संख्या देखील २०१८ साली वाढली असून ती संख्या ३७८२७७ इतकी आहे. त्यापैकी २०१८ भा. दं. वि. कलम ३७६ अन्वये नोंद झालेले बलात्काराच्या गुन्ह्याचे प्रमाण ३३३५६ इतके आहे. २०१७ साली ती संख्या ३५९८४९ इतकी होती.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post