केडगाव मध्ये सोन्याच्या दागिन्यांसह रोकड लंपास


माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर- राहत्या बंद घराच्या दरवाजाचे कडी-कुलूप-कोयंडा तोडून अज्ञात चोराने आत प्रवेश केला. आतील सामान व घरातील कपाटातील रुपयांचे 2 लाख 88 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागीने, 5 हजार रुपये रोख रक्कम असा ऐवज चोरुन नेला. ही घटना शनिवारी (दि.11) मध्यरात्री 2 च्या सुमारास घडली.

याबाबतची अधिक माहिती अशी की, संतराम शंभू मोरे (रा.राम मंदिरा समोर, अयोध्यानगर, केडगाव) हे त्यांच्या पुणे येथील नातेवाईकांच्या घरी कुटुंबासह शुक्रवारी (दि.10) सायंकाळी 5 वाजता गेले असता त्यांच्या बंद घराच्या दरवाजाचे कुलूप, कडी-कोयंडा तोडून अज्ञात चोरांनी घरात प्रवेश केला. आतील सामानची उचकापाचक केली. बेडरुममधील कपाटातील सामानाची उचका-पाचक करुन आतील लॉकरमध्ये 2 लाख 88 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे किंमतीचे सोन्याचे दागीने व 5 हजार रुपयेची रोकड असा ऐवज चोरुन नेला. पहाटे 3 च्या सुमारास मोरे कुटुंबिय पुणे येथील कार्यक्रम आटोपून घरी आले असता त्यांना घराचा दरवाजा उघडा दिसला. त्यांनी आत पाहिले असता आतील सामानाची उचका-पाचक झालेली दिसली. यावरुन घरात चोरी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. या घटनेची माहिती त्यांनी आजुबाजुचे शेजारी तसेच कोतवाली पोलीस ठाण्याला दिली. चोरीची माहिती मिळताच कोतवाली पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी घटनास्थळाची पाहणी करुन आजुबाजुला चौकशी केली. पोलिसांनी फिंगर प्रिंट ब्युरो तसेच श्‍वान पथकास पाचारण केले. पोलीस श्‍वानास आतील वस्तुचा वास दिला परंतु पोलीस श्‍वान घराच्या आजुबाजुलाच घुटमळले त्यामुळे पोलिसांना पुढील अंदाज बांधता आला नाही.

याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी संतराम मोरे यांच्या फिर्यादीवरुन भारतीय दंड विधान कायदा कलम 454, 457, 380 प्रमाणे घरफोडीच्या गुन्ह्याची नोंद केली असून अधिक तपास कोतवाली पोलीस हे करीत आहेत.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post