केडगाव दुहेरी हत्याकांड ; माजी महापौर संदीप कोतकर यांच्या जामिनावर सुनावणी पूर्ण...
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर : महापालिका केडगाव येथील पोटनिवडणूक निकालाच्या दिवशी दि.७ एपिल २०१८ रोजी दोन शिवसैनिकांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या दुहेरी हत्याकांड प्रकरणातील आरोपी माजी महापौर संदीप कोतकर याच्यावतीने जिल्हा न्यायालयात जामिनासाठी दाखल केलेल्या अर्जावर गुरुवारी (दि.२ जानेवारी) सुनावणी घेण्यात आली. हि सुनावणी पुर्ण झाली असून त्यावर शुक्रवारी (दि.३ जानेवारीला) निकाल होण्याची शक्यता आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, सन २०१८ मध्ये अहमदनगर महानगरपालिकेच्या केडगाव येथील माजी महापौर संदिप कोतकर यांच्या प्रभागात रिक्त जागेवर पोटनिवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीचा दि.७ एप्रिल २०१८ रोजी निकाल जाहिर होऊन काँग्रेसचे विशाल कोतकर निवडून आले. दरम्यान सायंकाळी शिवसेनेचे शहर उपप्रमुख संजय कोतकर व शिवसैनिक वसंत ठुबे हे शाहूनगर परिसरातील सुवर्णानगरमध्ये दुचाकीवरून फिरत असताना त्यांचे रस्त्याने समोरून दुचाकीवरून आलेल्या संदीप गुंजाळ याच्याशी वाद झाले. या वादातून आरोपी संदिप गुंजाळ याने संजय कोतकर व वसंत ठुबे यांच्यावर गोळ्या झाडून त्यांची हत्या केली. या दुहेरी हत्याकांडानंतर आरोपी गुंजाळ व इतर घटना स्थळावरून पसार झाले. घटनेनंतर आरोपी गुंजाळ पारनेर पोलिस ठाण्यात हजर झाला.याबाबत मयत संजय कोतकर यांचा मुलगा संग्राम कोतकर याने दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला. या गुन्ह्यातील आरोपी संदीप कोतकर हा शेवगाव येथील लॉटरी विक्रेता अशोक लांडे खून प्रकरणात नाशिक कारागृहात शिक्षा भोगत आहे.
दरम्यान दि.२६ डिसेंबर २०१९ रोजी आरोपी माजी महापौर संदीप कोतकर यांनी जिल्हा न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला. या जामीन अर्जावर जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.आर.जगताप यांच्यासमोर सुनावणी घेण्यात आली.यावेळी आरोपी संदिप कोतकर याच्यावतीने ॲड.महेश तवले यांनी युक्तिवाद केला. यावेळी ॲड.तवले म्हणाले की, आरोपी संदीप कोतकर हा नाशिक कारागृहात अशोक लांडे खून प्रकरणात शिक्षा भोगत आहे. त्याचा या गुन्ह्याची काहीही संबंध नाही केवळ राजकीय हेतूने त्याला या गुन्ह्यात गोवण्यात आले आहे. त्यामुळे संदिप कोतकर याला जामीन देण्यात यावा. तर सरकार पक्षाच्यावतीने ॲड.केदार केसकर यांनी युक्तिवाद केला की, आरोपी संदिप कोतकर हा अशोक लांडे खून प्रकरणात शिक्षा भोगत असताना दुसरा गुन्हा झाला आहे. घटनेच्या दिवशी आरोपी संदिप कोतकर हा उपचाराकामी धुळे येथील शासकीय रूग्णालयात गेलेला होता.तसेच घटनेच्या दिवशी आरोपीने मोबाईल वापरल्याचे पुरावे पोलिसांना मिळाले आहेत. त्यामुळे आरोपी कोतकर याला जामीन देण्यात येऊ नये. न्यायालयाने दोन्ही बाजुंचा युक्तिवाद ऐकून घेतला आहे. या जामीन अर्जावर शुक्रवार दि.३ जानेवारी रोजी निकाल होण्याची शक्यता आहे.
Post a Comment