'या' कारणामुळे माळीवाडा बसस्थानकातील फळविक्रेत्याला झाला 5 हजाराचा दंड


माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर- शहरातील जुन्या बसस्थानकातील फळ विक्रेत्याने कचरा टाकण्यासाठी डस्टबीन ठेवले नाही. तसेच दुकानाजवळच मोठ्या प्रमाणात कचरा आढळून आल्याने या फळविक्रेत्यावर जिल्हाधिकारी राहूल द्विवेदी यांनी 5 हजार रुपये दंडाची कारवाई केली आहे. तसेच शहरातील सर्वच हातगाडीवाले व फळविक्रेत्यांना डस्टबीन ठेवण्याची सक्ती केली आहे.

स्वच्छ सर्व्हेक्षण अभियानांतर्गत शहरात स्वच्छतेविषयी विविध उपक्रम राबविण्याची जोरदार मोहिम सुरू आहे. दैनंदिन स्वच्छता होते की नाही याची पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी तथा महापालिकेचे प्रभारी आयुक्त राहूल द्विवेदी, उपायुक्त सुनील पवार, स्वच्छता निरीक्षक राजेंद्र सामल, विजय चव्हाण हे गुरुवारी (दि.9) सकाळी जुन्या बसस्थानकात गेले होते. तेथे पाहणी करत असताना एका फळ विक्रेत्याने कचरा टाकण्यासाठी दुकानाजवळ डस्टबीन ठेवले नसल्याचे आढळून आले. तसेच त्याच्या दुकानाभोवती मोठ्या प्रमाणात कचरा आढळून आला. त्यामुळे जिल्हाधिकारी द्विदेदी यांनी सदर फळविक्रेत्यास त्या ठिकाणी 5 हजार रुपये दंड करण्याचे आदेश दिले. याशिवाय बस स्थानक परिसरात असलेल्या हातगाडी व फळविक्रेत्यांना डस्टबिन ठेवले नाही म्हणून दंडात्मक कारवाई करण्याचेही आदेश दिले. शहरात या पुढील काळात विक्रेत्यांनी हातगाडी व दुकानाजवळ कचर्‍यासाठी डस्टबीन ठेवले नाही तर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशारा यावेळी जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी दिला.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post