मुकुंदनगर परिसरात गॅस टाक्यांचा साठा जप्त ; दोघांवर गुन्हा


माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - बेकायदेशीररित्या घरगुती वापराच्या गॅस टाक्यांचा साठा करून बाजारात चढ्या भावाने विक्री करणार्‍यावर शहर पोलीसांनी छापा टाकून एक लाख 71 हजार 850 रूपये किंमतीच्या 18 गॅस टाक्या जप्त केल्या आहे. सय्यद जिशान आरीफ (वय- 32 रा. फकीरवाडा), जावेद आमीश सय्यद (वय- 41 रा. ख्रिस्त गल्ली) यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या छाप्यामुळे गॅसचा काळाबाजार करणाऱ्यांचे ढाबे दणाणले आहेत.


शहर पोलीसांनी ही कारवाई गुरूवारी (दि. 9) दुपारी अडीचच्या सुमारास मुकुंदनगर परिसरात केली. मुकुंदनगर परिसरातील लक्ष्मी आटा ट्रेडींग कंपनीचे आवारात बेकायदेशीररित्या गॅस टाक्यांचा साठा केला असून काही इसम या गॅस टाक्यांची विक्री बाजारात चढ्या दरांनी करत असल्याची माहिती शहर पोलीस उपाधीक्षक संदीप मिटके यांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे उपाधीक्षक मिटके, सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण पाटील, पुरवठा अधिकारी यांच्यासह पोलीस कर्मचारी यांनी लक्ष्मी आटा कंपनीच्या आवारात छापा टाकल. या छाप्यात पोलीसांनी 18 गॅस टाक्या जप्त केल्या. सय्यद आरीफ, जावेद सय्यद यांना ताब्यात घेऊन त्यांच्या विरूद्ध भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात जिवनावश्यक वस्तू कायदा कलम 3 व 7 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई प्रभारी पोलीस अधीक्षक सागर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस उपाधीक्षक संदीप मिटके, सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण पाटील, पुरवठा अधिकारी, सहायक फौजदार गायकवाड यांच्या पथकाने केली.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post