अहमदनगरमध्ये राजमाता जिजाऊ व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे स्मारक उभारावे


विविध सामाजिक संघटनांची मागणी
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - नगर शहरात राजमाता जिजाऊ व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे स्मारक उभारण्यात यावे यासाठी सामाजिक संघटनांच्यावतीने मनपा उपायुक्त डॉ.प्रदीप पठारे यांना निवेदन देण्यात आले. याप्रसंगी फुले ब्रिगेडचे शहराध्यक्ष दिपक खेडकर, यशस्वीनी महिला ब्रिगेडच्या रेखा जरे, जिजाऊ ब्रिगेड जिल्हाध्यक्षा अनिता काळे, छावा संघटनेच्या सुरेखा सांगळे, फिनिक्स फौंडेशनचे जालिंदर बोरुडे, डॉ.सुदर्शन गोरे, माऊली प्रतिष्ठान विनायक नेवसे, फुले ब्रिगेड शहराध्यक्ष दिपक खेडकर, आशिष भगत, सावता माळी युवक संघाचे लवेश गोंधळे आदि उपस्थित होते.

मनपा उपायुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, ज्यांनी स्त्री शिक्षणाची सुरुवात केली अशा क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले व राजमाता जिजाऊ यांचे स्मारक नगर शहरामध्ये उभारण्यात यावे. राजमाता जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांवर उत्तम संस्कार करुन स्वराज्य स्थापनेची प्रेरणा दिली. त्यांचा आदर्श समाजाने घेऊन पुढील वाटचाल करावी तसेच क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांनी क्लेरा ब्रुस हायस्कूल येथे शिक्षिकेचे प्रशिक्षण घेऊन स्त्री शिक्षणाची गंगा घरोघरी पोहचवली अशा या दोन्ही महान स्त्रीयांचे स्मारक किंवा पूर्णाकृती पुतळा नगर शहरात नसल्याने त्यांचे स्मारक नगरमध्ये उभारावे, अशी मागणी विविध संघटना करत आहे. तरी मनपा प्रशासनाने यांची तातडीने दाखल घ्यावी, असेही निवेदनात म्हटले आहे.

यावेळी दिपक खेडकर म्हणाले, शहरात अनेक थोर व्यक्तीमत्वांचे पुतळे आहेत. परंतु राजमाता जिजाऊ व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे पुतळे नाहीत. याबाबत विविध संघटनांच्यावतीने निवेदने देऊन पुतळे बसविण्याची मागणी अनेक वर्षांपासून सुरु आहे. मनपाने याबाबत लवकर कार्यवाही करावी, जेणे करुन त्यांच्या कार्याचा गौरव स्मारकाच्या माध्यमातून पुढील पिढीस कळण्यास मदत होईल.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post