रंगभवन लवकरच नाट्यप्रेमींसाठी उपलब्ध करुन देणार- महापौर बाबासाहेब वाकळे


प्रोफेसर कॉलनी येथे सक्षम युवा प्रतिष्ठानच्यावतीने मध्यरात्री 12 वा.
नटराज पूजनाने नववर्षाचे स्वागत
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर -   आपल्याला मनुष्यजन्म मिळालाय, पण हा जन्म-जीवन उत्तम बनवण्याऐवजी आपण कुठल्या दिशेने जातो. 31 डिसेंबर तर जणू गोल्डन डे झालाय. वर्षभरात ज्या मार्गाने आपण जात नाही, त्या मार्गाने मित्रांच्या संगतीने आणि आग्रहाने जातो आणि आपल्या जीवनाचे नुकसान करुन घेतो. देशाच्या विकासात युवकांचे मोठे योगदान असते. तेव्हा युवकांनी देश हित लक्षात घेऊन आपले आचारण ठेवले पाहिजे. युवकांनी देशाप्रती आपली कर्तव्य भावना जागृत ठेवून आपण करत असलेल्या कार्यातून देशसेवेचे व्रत जपले पाहिजे.  देशाची पुढील पिढी सक्षम व सुदृढ बनविण्यासाठी कार्य करावे. सक्षम युवा प्रतिष्ठानच्यावतीने नववर्षाचे हे अनोखे स्वागत तरुणांना दिशा दर्शक असे आहे. नाट्यप्रेमींचा जिव्हाळ्याचा सर्जेपुरा येथील रंगभवन नाट्यगृहाचे काम प्रगतीपथावर आहे. लवकरच नाट्यकर्मीसाठी हे सभागृह उपलब्ध होईल, असे प्रतिपादन महापौर बाबासाहेब वाकळे  यांनी केले.

सक्षम युवा प्रतिष्ठानच्यावतीने प्रोफसर कॉलनी चौक येथे नवीन वर्षाचे स्वागत महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या हस्ते नटराज पूजन करुन करण्यात आली. याप्रसंगी डॉ.सौ.सुधा कांकरिया, डॉ.प्रकाश कांकरिया, शिल्पकार प्रमोद कांबळे, प्रसिद्ध गायक पवन नाईक, प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मंगलाराम्, सचिव विराज मुनोत, सागर परदेशी, सुदर्शन कुलकर्णी, राज जोशी, संकेत होसिंग, तेजस अतितकर, प्रशांत जठार, अमोल लाटे, सचिन तुपे, आशितोष मेनसे, पुष्कर शुक्रे आदि उपस्थित होते.
यावेळी बोलताना डॉ.सुधा कांकरिया म्हणाल्या, भारतीय संस्कृती ही
जगात महान संस्कृती म्हणून ओळखली जाते. त्यामुळे आपल्या संस्कृतीचे
संरक्षण करणे गरजेचे आहे. थर्टीफस्टला घांगडधिंगाना घालून समाजात उपद्रव निर्माण करण्यापेक्षा काही विधायक कामे केली तर ती समाजासाठी व येणार्‍या पिढीसाठी आदर्शवत ठरतील. त्यामुळे युवकांनी अशाच विधायक कामात आपला वेळ घालविला पाहिजे, असे सांगून स्त्री भ्रुण हत्या रोखण्याची व स्वच्छतेची शपथ दिली.

यावेळी सक्षम युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मंगलाराप् म्हणाले,
प्रतिष्ठानच्यावतीने गेल्या 13 वर्षापासून 31 डिसेंबरच्या मध्यरात्री
नववर्षाचे स्वागत हे नटराज पूजनाने करण्यात येत असते. त्यामुळे
युवकांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमाची गोडी लागावी, त्याच्या कला-गुणांना
वाव मिळवा, हा या मागील उद्देश आहे. सक्षम प्रतिष्ठानच्यावतीने वर्षभर
विविध सामाजिक उपक्रम हाती घेण्यात येत असतात, असे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी विराज मुनोत म्हणाले, यामध्ये वृक्षारोपण, रक्तदान दान,
आरोग्य शिबीर, नाट्य प्रशिक्षण व विविध स्पर्धांच्या माध्यमातून मुलांना
स्टेज उपलब्ध करुन देण्यात येत असते. यापुढेही असेच उपक्रम सुरु राहतील. नगरचे कलाकार नाट्य क्षेत्रामध्ये  आपलं नाव राज्यात उज्वल केल्याशिवाय राहणार नाही.
यावेळी मराठी राज्यनाट्य स्पर्धेत नगर विभागास प्रथम क्रमांक
मिळाल्याबद्दल शैलेश देशमुख व गणेश लिमकर, एस.टी. विभागीय नाट्य
स्पर्धेतील अभय गोले यांचा व झी मराठी मालिका लेखनाबद्दल अमोल साळवे, एमएसईबी नाट्य स्पर्धेतील अविनाश कराळे यांचा सन्मान करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तेजस अतितकर  यांनी केले तर आभार संकेत होसिंग यांनी मानले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post