खातेवाटपावरून राष्ट्रवादीत नाराजी नाही- खा. शरद पवार


माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर- खातेवाटपावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांमध्ये नाराजी असल्याची चर्चा पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट शब्दांत फेटाळून लावली आहे. ’आमच्या पक्षात गृहमंत्रिपद नको, नको म्हणणारेच जास्त आहेत, असेही पवार यावेळी म्हणाले.

राज्यातील शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसच्या महाविकास आघाडी सरकारचा पहिला शपथविधी होऊन महिना उलटला आहे. नुकताच या सरकारने मंत्रिमंडळाचा विस्तारही केला. या विस्तारात मंत्रीपद न मिळाल्याने तिन्ही पक्षातील अनेक आमदार नाराज असतानाच आता खातेवाटपावरून राष्ट्रवादी धुसफूस असल्याचं समोर आलं आहे. नगरच्या दौर्‍यावर असलेल्या शरद पवारांना पत्रकारांनी याबाबत विचारले असता, तसे काहीही नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

’खाते वाटपावरून आमच्या पक्षात काहीही व कोणतही नाराजी नाही. आठ दिवसांपूर्वीच खातेवाटप निश्चित झाले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळी नव्या मंत्र्यांच्या खात्यांची घोषणा करतील,’ असे पवार म्हणाले. गृहखात्यावरून सुरू असलेल्या खेचाखेचीवर पवार म्हणाले, ’गृहखाते आम्हीच अनेकांना देत होतो. पण आमच्याकडे अनेकजण नको म्हणत होते. ’खातेवाटपाला उशीर होत असल्याचा आक्षेपही त्यांनी खोडून काढला. ’पूर्वी एक पक्षाचे सरकर असताना शपथविधी झाल्यानंतर दोन-दोन दिवस खातेवाटप होत नव्हते. आता तर राज्यात तीन पक्षांचे सरकार आहे,’ असं ते म्हणाले.

… म्हणून राहुरी तालुक्याला मंत्रिपद दिले
नगर जिल्ह्याला मंत्रिमंडळात मिळालेल्या प्रतिनिधित्वावरही त्यांनी भाष्य केले. ’नगरचे उत्तर किंवा दक्षिण मला कळत नाही, पण जिल्ह्यात कोणत्या तालुक्याला मंत्रिपद मिळाले नाही, याचा विचार करून राहुरीला मंत्रिपद दिल्याचे ते म्हणाले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post