माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर- नगर शहराबाहेरील बाह्यवळण रस्त्यावर निंबळक गावच्या शिवारात शेतजमीनीत तरुणाचा मृतदेह आढळून आला असून त्या तरुणावर अज्ञात इसमाने चाकुने हल्ला करुन त्याचा खून केल्याचे उघडकीस आले आहे. ही घटना मंगळवारी (दि.31) सकाळी निदर्शनास आली.
मयत तरुणाची ओळख पटली असून त्याचे नाव नवनाथ गोरख वलवे (वय – 32, रा.सारोळा कासार, ता.नगर) असे आहे. तो व्यवसायाने ट्रक चालक आहे. दुधाच्या पावडरचा पुरवठा करणे हा त्याचा व्यवसाय होता. ट्रकमधून दुधाची पावडर नेली जात होती. त्याचा खून व्यवसायीक स्पर्धेमधूनच झाला असावा अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी सारोळा कासारमधील ग्रामस्थांनी गर्दी केली होती. एमआयडीसी पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक मोहन बोरसे हे पथकासह घटनास्थळी रवाना झाले. घटनास्थळाची पाहणी करुन त्यांनी आजुबाजूला घटनेबाबत चौकशी केली. तरुणाच्या अंगावर चाकुने मारल्याच्या खुणा असल्याने या तरुणाचा चाकु हल्ल्यात खून करण्यात आल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते. हा खून मंगळवारी (दि.31) पहाटे झाला असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. पोलिसांनी अधिक तपासकामी श्वान पथकाला पाचारण केले आहे. या तरुणाचा खून कोणी केला व कोणत्या कारणाने केला, याबाबत दुपारी उशिरापर्यंत उलगडा झाला नसला तरी पोलीस कसून तपास करीत आहे. मयत नवनाथच्या पश्चात आई- वडिल, पत्नी, दोन बहिणी व एक 9 महिन्यांची मुलगी आहे.
Post a Comment