घरच्या घरी पिण्याचे पाणी असे करा शुद्ध..
अहमदनगर वेब टीम
प्रदूषित पाणी पिण्याने विविध रोग होऊ शकतात. नळाला कधीकधी एवढे घाण पाणी येते, की अगदी विचारायलाच नको. अशा वेळी नगरपालिकेला सगळेच शिव्या देतात; पण पुढे काय? असे पाणी प्यायचे की नाही? घरच्या घरी करण्याचे पाण्याच्या शुद्धीकरणाचे उपाय आता पाहू.
पाणी भरताना शक्यतो स्वच्छ फडक्यातून गाळून मगच भरावे. पाण्यात तुरटी फिरवावी. यामुळे धूळ, तरंगणारे कण इ. न विरघळणारी पाण्यातील अविद्राव्य घाण भांड्याच्या तळाशी गोळा होते. नंतर हे पाणी चौपदरी स्वच्छ कॉटनच्या फडक्यातून गाळून मग स्वच्छ भांड्यात भरावे. पाणी गाळून घेतल्यास नारू या रोगापासून आपण स्वतःचे रक्षण करू शकतो.
पाणी 10 ते 15 मिनिटे खळखळा उकळवून घेतल्यास ते निर्जंतुक होते. असे पाणी आरोग्याच्या दृष्टीने पिण्यास योग्य असले तरी या पद्धतीत पाणी बेचव झाल्याने प्यावेसे वाटत नाही. दुसरे म्हणजे इंधनाचा खर्चही येतो. त्यामुळे घरातील खूप पाणी तापवणे कठीण होऊन बसते. यासाठी पाणी शुद्धीकरणाचा दुसरा एक प्रभावी मार्ग वापरता येतो. तो म्हणजे पाण्यात क्लोरीन टाकणे.
क्लोरीनच्या गोळ्या वा द्रव क्लोरीन विशिष्ट प्रमाणात (हे प्रमाण गोळ्यांच्या पाकिटावर वा द्रव क्लोरीनच्या बाटलीवर लिहिलेले असते) पाण्यात टाकावा. अर्ध्या ते पाऊण तासाने असे पाणी पिण्यास योग्य बनते. सुरक्षित पाणी पिल्यास बरेचसे आजार आपण टाळू शकतो. स्वतःचे पाणी सुरक्षित करण्याचे हे घरगुती उपाय भारतात सर्वांनी वापरल्यास प्रदूषित पाण्यामुळे होणारे रोग व त्यामुळे होणारे लाखो बळी टाळता येतील.
Post a Comment