सज्जनगडावरील श्री रामदास स्वामींच्या पादुकांचे शहरात जयघोष व फटाक्यांची आतषबाजी करत पुष्पवृष्टीने उत्स्फूर्त स्वागत


माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर- श्रीरामदास स्वामी संस्थानकडून सुरू असलेला श्रीसमर्थ रामदास स्वामी पादुका प्रचार दौरा आज शुक्रवारी दि.१० जानेवारीला सायंकाळी गोरजमुहूर्तावर नगर शहरात पोहोचला.
श्रीरामदास स्वामींच्या पादुकांचे स्वागत बॅण्डपथकासह मोठा जयघोष करत झाले. फटाक्यांची जोरदार आतषबाजी करत पुष्पवृष्टी करण्यात आली. सुवासिनींनी औक्षण केले.
महापौर बाबासाहेब वाकळे, आ.अरूणकाका जगताप व आ.संग्राम जगताप यांनीही पादुकांना पुष्पहार घालून स्वागत केले.
पादुका आगमनासाठी गेली महिनाभर राबलेल्या भाविकांची उत्कंठा शिगेला पोहोचलेली होती. शहरासह उपनगरमधील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पादुकांचे आगमन होताच भाविकांनी एका सुरात श्रीसमर्थांचा जयघोष केला. महाजनगल्लीमध्ये विविधरंगी फुलांच्या पायघड्या अंथरण्यात आल्या होत्या.
श्री.मंदारबुवा रामदासी व श्री.सुनिलराव रामदासी यांच्या हाती पादुका दिल्यानंतर ते गायत्री मंदिराकडे निघाले असता भाविकांनी पादुकांवर उत्स्फूर्त पुष्पवृष्टी केली. पादुका गायत्री मंदिरात सुशोभित व्यासपीठावर विराजमान करण्यात आल्या. समर्थभक्त श्री.मंदारबुवा रामदासी यांनी सर्वांचे स्वागत केले.
आ.संग्रामभैय्या जगताप यांनी शहरात श्रीसमर्थांच्या पादुका येणे हे आपल्या सर्वांचे भाग्य आहे. दहा दिवस पादुका शहरात असल्याने भिक्षाफेरी निमित्त आपल्या भागात येणारे रामदासींना अधिकाधिक धन-धान्य अर्पण करण्याची सेवा नगरकर निश्चितच करतील. पादुका पूजनाचा आनंद घेतील. त्यानिमित्त आयोजित केलेल्या सर्व कार्यक्रमात सहभागी होऊन सेवेचा आनंद लुटतील, असा विश्वास आ. संग्रामभैय्या जगताप यांनी व्यक्त केला.
महापौर श्री.बाबासाहेब वाकळे म्हणाले, शहराचा प्रथम नागरिक या नात्याने नगरकरांच्यावतीने श्रीसमर्थांच्या पादुकांचे स्वागत करतो. आपल्या शहरात श्रीसमर्थांच्या पादुका आल्या आहेत. आपण सर्वजण अधिकाधिक सेवा करून धन्यता अनुभवू. येथील संयोजन समितीने फारच सुरेख नियोजन केलेले दिसते आहे. पादुकांसमोर होणारे सर्व कार्यक्रमात सहभागी होऊन हा पादुका दौरा यशस्वी करण्यातील योगदान नगरकर स्वयंस्फूर्तीने व श्रध्देने देतील, असे महापौर बाबासाहेब वाकळे यांनी सांगितले.
श्रीरामदास स्वामी संस्थानचे अध्यक्ष व समर्थ वंशज श्री.बाळासाहेब स्वामी यांनी समर्थ कोणत्या गावी जायचे? हे ठरवतात व त्याप्रमाणे पादुका दौरा निश्चित होतो, हि भाविकांची श्रध्दा असल्यानेच दौरा यशस्वितेसाठी तन-मन-धन अर्पण करण्यासाठी भाविक पुढे येतात, हे पहावयास मिळते. नगरमध्ये गतवेळी झालेल्या दौरापेक्षा यावेळची उपस्थिती लक्षणीय दिसत असल्याने हा दौरा अधिक यशस्वी होईल, हे स्वागत सोहळ्यातच स्पष्ट झाले आहे, असे बाळासाहेब स्वामींनी म्हणताच भाविकांमधून टाळ्यांचा कडकडाट झाला.
समर्थ वंशज श्री.भूषण स्वामी म्हणाले, आठ वर्षानंतर नगरमध्ये श्रीसमर्थांच्या पादुकांचे आगमन झाले आहे. नगरकरांनी श्रीसमर्थांची आठवण केल्याने हा दौरा नगरमध्ये होतो आहे. स्वागत सोहळ्यात धर्मसभा व राजसभा एकत्रित असणे हे शहर विकासाचे सुचिन्ह आहे. महापौर व आमदार पादुकांच्या स्वागतास उपस्थित राहिले. त्यामुळे संयोजन समितीचा उत्साह दुणावला आहे. शहरात या दौरानिमित्त आयोजित केलेल्या सर्व कार्यक्रमाचा नगरकरांनी मोठ्या संख्येने लाभ घेऊन श्रीसमर्थ सेवा करावी, असे आवाहनही श्री.भूषण स्वामींनी केले.
महापौर श्री.बाबासाहेब वाकळे, आ.संग्रामभैय्या जगताप व सनातन धर्मसभेचे अध्यक्ष श्री.दत्तोपंत पाठक गुरूजी यांचा सन्मान श्रीरामदास स्वामी संस्थानतर्फे करण्यात आला. कल्याणकरी रामराया... या प्रार्थनेने स्वागत समारंभाची सांगता करण्यात आली.
याप्रसंगी सर्वश्री सुनिलराव रामदासी, नरेंद्र कुलकर्णी, राजाभाऊ पोतदार, गिरीश मुळे, समिर उपाध्ये, मिलिंद चवंडके, महेश कुलकर्णी, हर्षद भावे, अनिल पुंड, सुनिलराव कुलकर्णी, बी.यु.कुलकर्णी, सागर उपाध्ये, पी.आर. कुलकर्णी, अविनाश धर्माधिकारी, प्रशांत थोरवे, मारूती बारसे, चकोर मुळे, संतोष गेनाप्पा, प्रकाश मुळे, नंदकुमार पोळ यांच्यासह भजनी मंडळातील भगिनी व उपनगरातील भाविक उपस्थित होते.
दि.१० ते २० जानेवारी दरम्यान येथील महाजन गल्लीतील गायत्री मंदिरात पादुकांसमोर भजन, गायन, प्रवचन, किर्तन, व्याख्यान अशा भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. श्रीरामदास स्वामी संस्थानचा रामदासी संप्रदायाप्रमाणे होणारा दैनंदिन कार्यक्रम नगरकरांना जवळून पहाण्याचे व या कार्यक्रमात सहभागी होण्याचे भाग्य लाभणार आहे. गायत्री मंदिरासमोर खास मंडप उभारून व्यासपीठही तयार करण्यात आले आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post