'ट्रॅफीक सिग्नल' च्या एकाच प्रश्नासाठी किती आंदोलने करायची ?


मनसे विद्यार्थी सेनेचा अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना सवाल
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - नगर शहरातील वाहतुकीची समस्या मार्गी लागण्यासाठी आणि चौकात होणारे अपघात टाळण्यासाठी प्रत्येक चौकात 'ट्रॅफीक सिग्नल' सुरु होणे आवश्यक आहे, परंतु प्रशासन काही त्याबाबत गांभीर्याने घेत नाही, 'ट्रॅफीक सिग्नल' च्या एकाच प्रश्नासाठी किती पाठपुरावा व आंदोलने करायची ? असा संतप्त सवाल मनसे विद्यार्थी सेनेच्या शिष्टमंडळाने अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना केला आहे.

'ट्रॅफीक सिग्नल' च्या प्रश्नाबाबत मनसे विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष सुमित वर्मा यांच्या नेतृत्वाखाली महेश शेळके, सुदर्शन वाळूंज, अनिकेत शियाळ,निखील बुरा, निखील देशपांडे, प्रकाश गायकवाड, अमोल बोरुडे यांच्या शिष्टमंडळाने अप्पर जिल्हाधिकारी पी.एल.सोरमारे यांची भेट घेवून निवेदन दिले.यामध्ये म्हंटले आहे की, ७-८ वर्षे झाली या एकाच समस्येविषयी निवेदने देवून अनेक आंदोलने केली आहेत. परंतु तरीही कोणत्याही अधिकाऱ्याने हा प्रश्न महत्त्वाचा समजून मार्गी लावला नाही याची खंत मनात आहे. २-३ सिग्नल देवाच्या कृपेने सुरू आहेत ते पण अगदी नगरकरांवर उपकार झाल्यासारखे कारण ना झेब्रा क्रॉस ना कोणत्याही प्रकारची शिस्त या ठिकाणी दिसते. वाईट या गोष्टीचे वाटते कि सिग्नलच्या चौकात झेब्रा क्रॉस लावावा ही मागणी करावी लागते. चालू सिग्नल पैकी या ठिकाणाहून आपणही कित्येत वेळा ये-जा केली असेल पण त्या ठिकाणी आपणांस का असे वाटले नाही कि सिग्नल चालु आहे पण झेब्रा क्रॉस लावला गेला नाही ? आत्ताच ५-६ दिवसांपूर्वी पत्रकार चौकात एका कर्तबगार तरूणाचा सिग्नलच्या बेशिस्तीमुळे जीव गेला. सिग्नल तोडून गेल्यानंतर त्या ठिकाणी पोलिस प्रशासन सुध्दा कोणावरही कारवाई करतांना दिसत नाही. तर या मध्ये प्रशासन कुठेतरी चुकतंय असे वाटत नाही का? दर वेळी सिग्नल चालु करा या मागणीचे निवेदन द्यायचे पण या मागणीला केराची टोपलीच दाखवली जाते. सक्कर चौक सारखा अगदी धोक्याचा चौक पण त्या ठिकाणचा सिग्नल चालु होण्यासाठी अजुन किती जणांचा जीव जावा असे प्रशासनाला वाटते याचा खुलासा तरी करा. वाहतूक शाखा, महापालिकेकडे व महापालिका वाहतुक शाखेकडे या विषयाची टोलवाटोलवी करत आहेत. पण याचे गांभिर्य अजुनही का लक्षात येत नाही.

अजुन किती नगरकरांचे जीव या सिग्नलच्या प्रश्नामुळे जावे असे प्रशासनाला वाटते. चांदणी चौकात तर महाविद्यालयीन विद्यार्थी जीव मुठीत घेऊन चालतात, या चौकामध्ये मागेच एका अपघातात महाविद्यालयीन तरूणीचा मृत्यू देखील झालेला आहे. पण या सिग्नलचा वापर मात्र कधीही झाला नाही. शहरातील बहुतांशी सिग्नल असे आहेत जे फक्त “शोभेची वस्तू" म्हणून लावली गेलेली आहे. पण याचा वापर केला गेला नाही. कृपया या गोष्टीकडे गांभिर्याने पहा. सक्कर चौक, इंपेरियल चौक, मार्केटयार्ड चौक, कायनेटीक चौक, चांदणी चौक, स्टेट बँक चौक, डि.एस.पी.चौक, पत्रकार चौक, प्रेमदान चौक, एम.आय.डि.सी.भाग हे सर्व सिग्नल कायम स्वरूपी चालू करून त्या ठिकाणी झेब्रा क्रॉसिंगची आखणी तात्काळ करण्याचे आदेश द्यावे त्याचप्रमाणे सिग्नल तोडून पुढे जाणाऱ्यांवर व झेब्रा क्रॉस च्या पुढे थांबणाऱ्यांवर किमान ५००० रूपये दंड अथवा गाडी चालवण्याचा परवाना रद्द करण्याची कारवाई करावी. या प्रकारचे निर्देश तरी काढा म्हणाजे लोक या भितीपोटी तरी सिग्नलवर थांबतील. कृपया यामध्ये गांभिर्याने लक्ष घालावे अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post