देशव्यापी लाक्षणिक संपात विडी कामगार सहभागी
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - केंद्र सरकारच्या कामगार विरोधी धोरणाच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या लाक्षणिक देशव्यापी संपात महाराष्ट्र राज्य विडी कामगार फेडरेशन, लाल बावटा कामगार युनियन व नगर विडी कामगार संघटना देखील सहभागी झाल्या होत्या. कामगार विरोधी धोरणाचा निषेध नोंदवत व विडी कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी विडी कामगार महिलांनी माळीवाडा बसस्थानक येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर निदर्शने केली. यावेळी विडी कामगार नेते कॉ.शंकर न्यालपेल्ली, शंकरराव मंगलारप, सुभाष लांडे, श्रीमल सगुना, लक्ष्मी न्यालपेल्ली, कमलाबाई दोंता, निर्मला न्यालपेल्ली, लिलाबाई भारताल, सरोजनी दिकोंडा, ईश्वरी सुंकी आदींसह विडी कामगार महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
कामगार संघटना महासंघाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेल्या मोर्चात विडी कामागर महिला सहभागी झाल्या. विडी कामगारांना राष्ट्रीय पातळीवर समान काम समान वेतन निश्चित करण्यासाठी समिती नेमावी, विडी उद्योगास संरक्षण द्यावे, सार्वजनिक संस्थांचे खाजगीकरण रद्द करावे, विक्रीवरील जीएसटी 28 टक्के रद्द करून 5 टक्के कर लागू करावा, तेलंगणा सरकारच्या धर्तीवर विडी कामगारांना दरमहा 2 हजार रुपये जीवन आसरा भत्ता द्यावा, सर्व पेन्शनर कामगारांना दरमहा 6500 रु. पेन्शन लागू करण्याची मागणी संघटनांच्या वतीने करण्यात आली आहे.
Post a Comment