महाराष्ट्र केसरीवर थांबायचे नाही..



माय अहमदनगर वेब टीम
​​​​​​पुणे - पहिलवानांनी महाराष्ट्र केसरी गदा मिरवण्यात समाधान मा‌नण्यापेक्षा ऑलिम्पिक सुवर्णपदक मिळवण्याची जिद्द मनात बाळगून कुस्तीचा सराव करावा. चिकाटीने प्रयत्न करणारी युवा कुस्तीपटू महाराष्ट्रात आहेत. मात्र महाराष्ट्र केसरीच्या उत्तरार्धातील दयनीय प्रवास खडतर जातो. हे वास्तव आहे. आयुष्याच्या उत्तरार्धातील हालअपेष्टा टाळण्यासाठी कुस्तीगीर पहिलवानांनी राष्ट्रीय व जागतिक स्तरावर चमकण्याचा प्रयत्न करावा. १९५२ नंतर खाशाबा जाधव यांच्या पश्चात अजून कोणीही आॅलिम्पिकमध्ये भारतासाठी सुवर्ण आणले नाही, अशी खंत व्यक्त केली. केसरीनंतर हर्षवर्धनला राष्ट्रीय व ऑलिम्पिक स्पर्धेत गाजवण्यासाठी तयार करणार आहे. आता २०२४ मध्ये महाराष्ट्रातील पहिलवानांनी ऑलिम्पिक गाजवावी ही एकच इच्छा आहे. पुढील महाराष्ट्र केसरी स्पर्धेत शैलेश शेळके खेळेल, अशी घोषणा अर्जुन पुरस्कार विजेते काका पवार यांनी केली.

ते पुण्यात पुणे श्रमिक पत्रकार संघाकडून आयोजित वार्तालाप कार्यक्रमात बोलत होते. या वेळी महाराष्ट्र केसरी विजेता हर्षवर्धन सदगीर व उपविजेता शैलेश शेळके यांनी आपल्या गुरूविषयी कृतज्ञता व्यक्त केली. पवार यांचे दोन्ही पठ्ठे अनुक्रमे विजेता हर्षवर्धन सदगीर व उपविजेता शैलेश शेळके यांनी यंदा महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा वेगळ्याच अंदाजामध्ये गाजवली आहे. तीनदा महाराष्ट्र केसरीची गदा जिंकल्यावर पोलिस उपअधीक्षक करण्याची महाराष्ट्र शासनाने परंपरा सुरू केली आहे. मात्र इतर वजन गटात कुस्ती करणारा हरणाऱ्याच्या हाती काही लागत नाही. म्हणून हरियाणा सरकारप्रमाणे महाराष्ट्रानेदेखील महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत खेळणाऱ्या प्रत्येकाला नोकरीची तरतूद करावी.

शासन दरबारी कुस्ती खेळाविषयी अनास्थेचा बळी ठरलेल्या कुस्तीला चमकदार कामगिरी करणाऱ्या कुस्तीगिरांना भविष्यात खूप हालअपेष्टांना सामोरे जावे लागते. महाराष्ट्राच्या मातीतील खेळ असल्याने प्रामुख्याने ग्रामीण भागामध्ये कुस्ती खेळाचे आकर्षण आहे. मात्र आयुष्याच्या उत्तरार्धात नावाजलेल्या कुस्तीगिरांची दयनीय अवस्था होते. प्रसंगी उपासमारीची वेळ येते, तर आर्थिक चणचण कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडताना नैराश्यातून दारूचे व्यसन जडते. त्यासाठी प्रत्येक गट व फेरीतून विजयी झालेल्या पहिलवानाची भविष्य घडवण्यासाठी सरकार व समाजाने पुढे येण्याची गरज आहे. समाजात कुस्तीसाठी मदत करणाऱ्या खूप व्यक्ती पुढे येतात. मात्र त्याचे व्यवस्थापन करून महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेने पुढाकार घेत कुस्ती लीग या आयपीएल क्रिकेटसारखी स्पर्धा भरवावी. त्यामुळे कुस्तीमध्ये भविष्य युवकांना दिसेल. नोकरीच्या धोरणामुळे हरियाणा पोलिसांत मोठ्या प्रमाणात कुस्तीगीर आढळून येतात. मात्र, महाराष्ट्रात तसे होत नाही. रशिया, जपान, इराण या देशांतील कुस्तीपटूंना आपल्या कुटुंबाची काळजी नसते. याप्रमाणे शासनाने क्रीडा धोरण राबवले पाहिजे. अशी अपेक्षा पवार यांनी व्यक्त केली.

गैरप्रकारामुळे माझी निवड हुकली

ऑलिम्पिकसाठी निवड समितीमध्ये मोठ्या प्रमाणात खूप चुकीचे प्रकार चालतात. त्यामुळे महाराष्ट्रातील नामवंत मल्ल ऑलिम्पिक स्पर्धेपासून वंचित राहतात. ऑलिम्पिक विजेता संदीप तुमर याचा दोनदा १० - ० असा दारुण पराभव करणारा महाराष्ट्रीय कुस्तीपटू मागे पडतो. यातून चुकीचा प्रकार असल्याचे जाणवते. वारंवार वजन कमी करण्यास भाग पाडून माझे ही ऑलिम्पिकमधून भारतासाठी पदक आणण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही. हा अन्याय आपल्यावरही झाला अशी खंत काका पवार यांनी व्यक्त केली.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post