नगरकरांच्या पाणीपट्टीत 10 टक्के वाढ



माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर- शहरातील मालमत्ताधारकांच्या पाणीपट्टीत दुप्पट वाढ करण्याचा प्रस्ताव गुरूवारी (दि.6) झालेल्या स्थायी समितीच्या सभेत फेटाळण्यात आला. फक्त 10 टक्के वाढ करण्यास ‘स्थायी’ ने मंजुरी दिली असुन फेज 2 पाणी योजना पुर्ण करून सुरळीतपणे कार्यान्वित करावी व त्यानंतर दरवाढीचा प्रस्ताव ठेवावा, असा आदेशही यावेळी पाणीपुरवठा विभागाला देण्यात आला.

स्थायीचे सभापती मुदस्सर शेख यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समितीची गुरूवारी सकाळी सभा झाली. या सभेस नगरसेवक गणेश भोसले, सुभाष लोंढे, नगरसेविका सोनाली चितळे, आशाताई कराळे, सुवर्णा जाधव, उपायुक्त प्रदीप पठारे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. सभेपुढे पाणीपुरवठा विभागाने सादर केलेला दुप्पट पाणीपट्टी दरवाढीचा प्रस्ताव होता यावर चर्चा करण्यात आल्यानंतर सध्या केवळ 10 टक्के दरवाढ करण्यास मंजुरी देण्यात आली. तसेच फेज 2 पाणी योजना पुर्ण क्षमतेने कार्यान्वित झाल्यावर आणखी दरवाढीचा प्रस्ताव स्थायी समोर ठेवावा, असे आदेश देण्यात आले.

याशिवाय महापालिकेच्या उत्पन्नाचे स्त्रोत वाढविण्याचा प्रयत्न करा, नव्याने झालेल्या घरांची नोंदणी करून त्यांना अधिकृत नळ जोडण्या द्या, अनेकजण अनाधिकृत नळ जोड घेऊन पाणी चोरी करीत आहेत त्यांचा शोध घ्या व कारवाई करा, अशा सुचनाही देण्यात आल्या.

रस्ता बाजु शुल्कात दुप्पट वाढ

या सभेपुढे मार्केट विभागाने ऐनवेळच्या विषयात रस्ता बाजु शुल्कात वाढ करण्याचा प्रस्ताव सादर केला होता. त्यास मंजुरी देण्यात आली. त्यानुसार रस्ता बाजु फी 10 रूपयांऐवजी 20 रूपये, रात्रीच्या वेळी लागणार्‍या खाद्य पदार्थांच्या गाड्यांना 15 ऐवजी 30 रूपये शुल्क, मांस विक्री दुकानांसाठी प्रती बकरा-बकरी 5 रूपये ऐवजी 10 रूपये शुल्क आकारले जाणार आहे. गाळे, हॉल, शाळा वर्ग खोल्या, खुल्या जागा, व्यायामशाळा यांचा नविन दर ठरविण्यासाठी शासनाने ज्या मार्गदर्शक सुचना केल्या आहेत त्यानुसार प्रस्ताव पुढील सभेत ठेवण्यात यावा, अशी सुचनाही यावेळी देण्यात आल्या.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post