अॅट्रॉसिटीत ’तत्काळ अटक’ कायम; अंतरिम जामीनही नाही सुप्रीम निर्णय


माय अहमदनगर वेब टीम
नवीदिल्ली- अनुसूचित जाती, जमातींविरोधी अत्याचाराला प्रतिबंधक करणार्‍या अॅट्रॉसिटी कायद्याच्या वैधतेला आव्हान देणारी याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावली आहे. या कायद्यातील सुधारणांना सुप्रीम कोर्टाने मंजुरी देत या कायद्यांतर्गत तत्काळ अटक करण्याची तरतूद कायम राहणार असून कोणत्याही व्यक्तीला या कायद्यांतर्गत अंतरिम जामीन मिळणार नाही, असे सुप्रिम कोर्टाने स्पष्ट केले आहे.

न्यायाधीश अरुण मिश्रा, न्यायाधीश विनीत शरण आणि न्यायाधीश रवींद्र भट्ट यांच्या खंडपीठाने एससी एसटी सुधारणा कायद्याला मंजुरी दिली. या कायद्याला आव्हान देणारी याचिका फेटाळून लावताना सुप्रीम कोर्टाने या कायद्यांतर्गत तत्काळ अटक करणे आणि अंतरिम जामीन नाकारणे या तरतुदी कायम राखल्या आहेत. केंद्र सरकारने एससी-एसटी कायद्यात सुधारणा करत एखाद्या आरोपीला अटक केल्यानंतर त्याला अंतरिम जामीन देण्यावर प्रतिबंध केला आहे.

20 मार्च 2018 ला सुप्रीम कोर्टाने अॅट्रॉसिटी कायद्यातील एखाद्या आरोपीला अटक करण्याबाबतच्या तरतुदी काहीशा शिथील केल्या होत्या. तसेच, या कायद्यांतर्गत आरोपीला अंतरिम जामीन देण्याचीही तरतूद केली होती. या कायद्यानुसार, एखाद्या सरकारी कर्मचारी अथवा अधिकार्‍यावर कारवाई करताना त्याच्या अटकेपूर्वी संबंधित विभागाची अनुमती घेणे आवश्यक असल्याचीही या कायद्यात तरतूद करण्यात आली होती. याबरोबच सर्वसामान्य व्यक्तीवर या कायद्यांतर्गत आरोप असल्यास एसएसपींच्या स्तरावर पोलीस अधिकार्‍याची अनुमती घेणे आवश्यक होते. शिवाय एफआयआर दाखल करण्यापूर्वी त्या प्रकरणातील प्राथमिक चौकशी करणे आवश्यक आहे अशीही पूर्वीच्या कायद्यात सुधारणा करण्यात आली होती.

सरकारने बदलला सुप्रीम कोर्टाचा निर्णय
सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयानंतर केंद्र सरकारने संसदेत या कायद्यात सुधारणा केल्या आणि मूळ तरतुदी पुन्हा आणल्या. याच बदलाला सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आले. या प्रकरणावरील सुनावणीनंतर सुप्रीम कोर्टाने आपला निर्णय राखून ठेवला होता. सुप्रीम कोर्टाने या कायद्यातील तरतुदी शिथील करण्याचा निर्णय मागे घेतला.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post