हातात तलवारी घेऊन चोरट्यांचा अहमदनगरमध्ये धुमाकूळ


माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर- अंगात काळे जॅकेट, काळी पॅन्ट, तोंडावर माकड टोपी आणि हातात नंग्या तलवारी, लाकडी दांडके आणि गलोली घेऊन चोरट्यांच्या टोळीने बुधवारी (दि.6) मध्यरात्री कल्याण रोड परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण केले. शस्त्रे हातात घेऊन परिसरातील रस्त्यांवर या चोरट्यांनी तब्बल तीन तास धुमाकूळ घातला. चोरट्यांच्या हल्ल्यात एक महिला जखमी झाली आहे. अखेर पोलिसांची गाडी आल्यानंतर चोरटे पसार झाले.

नगर शहराच्या अत्यंत जवळचा परिसर म्हणून कल्याण रोड परिसर समजला जातो. या परिसरात मोठी लोकवस्ती आहे. बुधवारी (दि.6) मध्यरात्री 1 वा. च्या सुमारास 8 चोरट्यांची टोळी शस्त्रांसह परिसरातील रस्त्यांवर दिसून आली. या चोरट्यांच्या हातात तलवारी, दांडके आणि गलोली होत्या. सशस्त्र दरोड्याच्या तयारीत असलेल्या या टोळीने परिसरात दहशत निर्माण केली. गणेशनगर, शिवाजीनगर, विद्या कॉलनी, समतानगर, गाडळकर मळा, अनुसयानगर या भागात चोरटे हातात तलवारी आणि दांडके घेऊन रस्त्यावरुन फिरत होते. त्यामुळे परिसरातील नागरिक भयभित झाले आहेत. चोरटे रस्त्यावर खुलेआम फिरत असताना कोणत्याही नागरिकाचे घराबाहेर पडण्याचे धाडस झाले नाही. अनेक नागरिकांनी आपआपल्या घराच्या खिडकीतून या चोरट्यांना पाहिले. कुत्री भुंकत राहिल्याने अनेक नागरिक जागे झाले. त्यामुळे चोरट्यांना आपला चोरीचा उद्देश साध्य करता आला नाही.

तब्बल तीन तास चोरट्यांनी कल्याण रोड परिसरातील कॉलन्या आणि विविध भागात धुमाकूळ घातला. गणेशनगर येथे पहाटे 4 वा. च्या सुमारास एक महिला घराबाहेर आल्यानंतर चोरट्यांनी तिला गलोलीतून दगड मारला. या हल्ल्यात महिना जखमी झाली परंतु आरडाओरडा झाल्याने चोरटे तेथून पळाले. नागरिक जागे झाले की चोरटे आपला मार्ग बदलत होते. अखेर पहाटे 4 वा. च्या सुमारास नागरिकांनी पोलिसांशी संपर्क साधला. त्यानंतर पोलीस तातडीने परिसरात हजर झाले. पोलिसांची गाडी सायरन वाजवत आल्याने चोरट्यांनी पळ काढला. चोरट्यांचा हा धुमाकुळ सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाला आहे.

विशेष म्हणजे तब्बल तीन तास चोरटे या परिसरातील रस्त्यांवर हातात शस्त्रे घेऊन फिरत होते. त्यामुळे नागरिकांमध्ये मोठी घबराट पसरली आहे. चोरट्यांचा हेतू चोरीचा होता की दहशत निर्माण करण्याचा असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. चोरट्यांच्या भितीमुळे नागरिकांना रात्र जागूनच काढावी लागली.

शहर आणि परिसरात चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यातच आता कल्याण रोड परिसरात तलवारी, दांडक्यांसह शस्त्रे हातात घेऊन चोरटे रस्त्यावर फिरत असल्याने पोलिसांचा धाक राहिला नसल्याचे स्पष्ट होत आहे. या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी या परिसरात रात्रीची गस्त वाढवावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post