घोसपुरी सोसायटीच्या शेतकरी सभासदांना अपघात विम्याचे कवच
दोघा शेतकऱ्यांना विमा क्लेम मंजूर; धनादेशाचे केले वितरण
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - नगर तालुक्यातील घोसपुरी येथील विविध कार्यकरी सेवा सहकारी सोसायटीने सर्व शेतकरी सभासदांचा नागरिक सुरक्षा अपघात विमा उतरविला आहे. याचा लाभ दोन सभासदांना झाला असून त्यांना अपघात झाल्याने त्यांच्या विम्याचा क्लेम मंजूर झाला आहे. या विमा रकमेच्या धनादेशाचे वितरण नुकतेच करण्यात आले आहे.
संस्थेच्या सप्टेंबर २०१९ मध्ये झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत संस्थेच्या सर्व शेतकरी सभासदांचा सुरक्षा विमा उतरविण्याची संकल्पना चेअरमन रामदास कवडे व माजी चेअरमन सुनील ठोकळ यांनी मांडली. या अभिनव संकल्पनेचे सर्वांनी एकमताने स्वागत करत हा ठराव मंजूर केला. त्यानुसार ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीकडे सोसायटीच्या सर्व शेतकरी सभासदांचा नागरीक सुरक्षा अपघात विमा उतरविण्यात आला होता.
संस्थेने घेतलेल्या या निर्णयाचा फायदा सभासदांना होवू लागला आहे. संस्थेचे सभासद बाळू मारुती घोडके व भाऊसाहेब ठकाजी गाढवे यांना काही दिवसांपूर्वी अपघात झाला होता. त्यामुळे त्यांना दवाखान्यात उपचार घ्यावे लागले होते. संस्थेच्या वतीने विमा कंपनीकडे विमा क्लेम साठी प्रस्ताव देण्यात आला होता. कंपनीने घोडके यांना ४० हजार व गाढवे यांना ३८ हजाराचा क्लेम मंजूर केला आहे. त्या रकमेच्या धनादेशाचे वितरण ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीचे व्यवस्थापक श्री.साबळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी सभापती अशोक झरेकर, चेअरमन रामदास कवडे, माजी चेअरमन सुनील ठोकळ, व्हा.चेअरमन बाबूराव घोडके, संचालक विलास झरेकर, प्रदीप झरेकर,विलास खोबरे, डॉ.विठ्ठल खोबरे, नानासाहेब गाढवे, संदीप लांडगे, सोमनाथ झरेकर, सौ. बेबी घोडके, संतोष पारधे, सदाशिव हांडोरे, राजू पाचारणे, सचिव सुनिल झरेकर आदी उपस्थित होते.
सर्वसामान्य शेतकरी हा आपल्या स्वत:च्या आरोग्याकडे कायमच दुर्लक्ष करत शेतीच्या कामात गुंतलेला असतो. बहुतांश शेतकरी हे अशिक्षीत असल्यामुळे तसेच त्यांना विमा पॉलेसीचे सुरक्षा कवच असावे याबाबत फारसे ज्ञान नसल्याने त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे या सभासदांच्या हितासाठी संस्थेच्या वतीने हा निर्णय घेण्यात आला होता. त्याचा फायदा सभासदांना होवू लागला आहे. ग्रामीण भागातील सर्वच सोसायट्यांनी अशा प्रकारे उपक्रम राबविल्यास सर्वसामान्य शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल. - सुनिल ठोकळ, माजी चेअरमन
Post a Comment