माय अहमदनगर वेब टीम
मुंबई : बांगलादेशी व पाकिस्तानी घुसखोरांना हाकलण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं आज मुंबईत काढलेल्या मोर्चाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मनसेनं दावा केल्यानुसार खरोखरच हा मोर्चा महामोर्चा झाला. महाराष्ट्राच्या जिल्ह्याजिल्ह्यातून हजारोंच्या संख्येनं आलेले कार्यकर्ते मोर्चात सहभागी झाले होते. राजकीय भूमिका बदलल्यानंतर झालेल्या या पहिल्याच मोर्चात मनसेनं आपली ताकद पुन्हा एकदा दाखवून दिली. या विराट मोर्चामुळं मुंबई भगवामय झाली होती.
मराठीच्या मुद्द्यावरून राजकारण करणाऱ्या मनसेनं काही दिवसांपूर्वीच पक्षाचा झेंडा बदलून राजकीय ट्रॅक बदलण्याचे संकेत दिले होते. त्याच अधिवेशनात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईतील घुसखोरांचा मुद्दा उचलला होता व त्या विरोधात मोर्चा काढण्याची घोषणा केली होती. त्यानुसार आज हा मोर्चा निघाला. या मोर्चासाठी राज्याच्या विविध जिल्ह्यांतून हजारोंच्या संख्येनं मनसैनिक सकाळपासूनच मुंबईत दाखल झाले. औरंगाबाद, नाशिक, कोल्हापूर, पुणे, ठाण्यातील मनसैनिकांची मोर्चाला मोठी उपस्थिती होती. शिवरायांची राजमुद्रा असलेला मनसेचा नवा भगवा झेंडा हा मोर्चाचं मुख्य आकर्षण होता. मोर्चासाठी आलेल्या कार्यकर्त्यांच्या गाड्यांवर व हातात हे झेंडे पाहायला मिळत होते. त्याशिवाय, मनसेच्या हिंदुत्वाच्या भूमिकेवर खूश असलेले अनेक कार्यकर्ते भगवा वेष परिधान करून मोर्चात सहभागी झाले होते. त्यामुळं संपूर्ण वातावरण भगवामय झाले होते.हा मोर्चा दुपारी १२ वाजता निघणार होता. मात्र, गर्दीचा ओघ वाढत असल्यानं मोर्चा सुरू होण्यास उशीर झाला. दुपारी तीनच्या सुमारास मरिन लाइन्सवरील हिंदू जिमखाना येथून मोर्चा सुरू झाला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोर्चाचं नेतृत्व केलं. त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे, मनसेच्या नेतेपदी निवड झालेले राज यांचे सुपुत्र अमित ठाकरे हे देखील मोर्चात सहभागी झाले होते. आझाद मैदानात या मोर्चाचं सभेत रूपांतर झालं. तिथं राज यांनी मोर्चेकऱ्यांना संबोधित केलं.राज यांनी यावेळी केंद्र सरकारनं केलेल्या सुधारीत नागरिकत्व कायद्याला जाहीर पाठिंबा दिला. 'देशातील घुसखोरांची हकालपट्टी झालीच पाहिजे. या कायद्याविरोधात देशात निघणाऱ्या मोर्चाला हे मोर्चानं दिलेलं उत्तर आहे. मोर्चाच्या माध्यमातून महाराष्ट्राचं दर्शन झालंय. आता मोर्चाला मोर्चानं उत्तर दिलंय. यापुढं नाटकं कराल तर दगडाला दगडानं व तलवारीला तलवारीनं उत्तर दिलं जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.
Post a Comment