महापालिका पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीला धक्का; भाजपाचा दणदणीत विजय


माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर – महापालिकेच्या प्रभाग 6 मधील पोटनिवडणुकीमध्ये भाजपाच्या पल्लवी जाधव यांचा दणदणीत विजय मिळवत शिवसेनेच्या उमेदवार अनिता दळवी यांचा तब्बल 1712 मतांनी दारूण पराभव केला आहे. गेल्या 4 महिन्यातील विधानसभा निवडणुकीनंतर नगरमध्ये शिवसेनेला बसलेला दुसरा धक्का आहे.

महापालिकेच्या प्रभाग 6 मधील पोटनिवडणुकीसाठी मतदारांमध्ये गुरुवारी (दि.6) निरुत्साह दिसला. निवडणुकीसाठी अवघे 31 टक्के मतदान झाले होते. एकूण 13 हजार 621 मतदारांपैकी अवघ्या 4 हजार 237 जणांनी मतदानाचा हक्क बजावला होता. शुक्रवारी (दि.7) सकाळी 10 वाजता जुन्या महापालिका कार्यालयात मतमोजणीला सुरुवात झाली. पहिल्या फेरीपासूनच भाजपाच्या पल्लवी जाधव यांनी मोठी आघाडी घेतली होती. तिसर्‍या फेरीअखेर जाधव यांना 2317 तर दळवी यांना 724 मते मिळाली. चौथ्या फेरी अखेर भाजपच्या जाधव 2915 मते घेत तब्बल 1712 एवढ्या मोठ्या मताधिक्क्याने विजयी झाल्या. शिवसेनेच्या दळवी यांना 1203 तर नोटाला 119 मते मिळाली. निकाल जाहीर होताच भाजपाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी मतमोजणी केंद्राच्या परिसरात जल्लोष केला.

त्यानंतर शहर भाजपा कार्यालयात महापौर बाबासाहेब वाकळे, उपमहापौर मालनताई ढोणे, शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे, सुवेंद्र गांधी, नगरसेवक राहूल कांबळे, रवी बारस्कर, दत्ता गाडळकर, मनोज ताठे, पुष्कर कुलकर्णी, बाळासाहेब गायकवाड, वैभव सुरवसे, नरेंद्र कुलकर्णी, सतीश ताठे, बाबा भिंगारदिवे, निलेश जाधव, मुकुल गंधे, महेश कराळे, पप्पू गर्जे, उदय कराळे, किशोर वाकळे, नगरसेविका आशाताई कराळे, वंदना ताठे, कालिंदी केसकर यांच्यासह भाजपच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष करीत नवनिर्वाचित नगरसेविका पल्लवी जाधव यांचा सत्कार केला.

महापौर बाबासाहेब वाकळे ठरले किंग मेकर
महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या प्रभागातील ही पोटनिवडणूक असल्याने व वर्षभरापूर्वीच्या सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेनेने ही जागा जिंकली असल्याने त्यांच्याकडून ती भाजपकडे खेचून घेण्याचे आव्हान त्यांच्यासमोर होते. त्यामुळे त्यांच्यासह भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सावेडी गावठाण, धर्माधिकारी मळा परिसरात विशेष जोर लावला होता. तर अन्य केंद्रांवर पक्षाच्या स्थानिक पदाधिकार्‍यांची मदत घेतली होती. या निवडणुकीची सर्व प्रचार यंत्रणा महापौर वाकळे यांनीच हाताळली आणि त्यांच्यासाठी अतिशय प्रतिष्ठेची असलेली ही निवडणुक मोठ्या मताधिक्याने जिंकत त्यांनी या प्रभागात आपणच किंगमेकर असल्याचे दाखवुन दिले.

या विजयानंतर प्रतिक्रिया देताना महापौर वाकळे म्हणाले, शहरात गेल्या वर्षभरात केलेल्या विविध विकासकामांची पावती जनतेने भाजपाला दिली आहे. यापुर्वी शिवसेनेची असलेले जागा भाजपाने आपल्याकडे खेचून आणली आहे. राज्यातील सत्तेचा महाविकास आघाडीचा प्रयोग येथे करण्याचा प्रयत्न झाला मात्र मतदारांनी या महाविकास आघाडीला धोबीपछाड दिली आहे. भाजपाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी घेतलेल्या परिश्रमाचे चिज झाले असल्याचे त्यांनी सांगितले.

शिवसेनेतील गटबाजी आणि महाविकास आघाडीचा फसलेला प्रयोग
विधानसभा निवडणुकीनंतर शहर शिवसेनेत दुफळी निर्माण झालेली असुन या गटबाजीचे प्रदर्शन या पोट निवडणुकीतही दिसुन आले. शिवसेनेत असलेले दोन गट स्वतंत्ररित्या प्रचार करत असल्याचे संपुर्ण प्रचाराच्या कालावधीत दिसत होते. यातील एका गटाने राज्यात असलेल्या महाविकास आघाडीचा प्रयोग नगरमध्ये राबविण्याचा प्रयत्न शेवटच्या टप्प्यात केला. मात्र तो पर्यंत बराच उशिर झालेला होता. हा प्रयोग करतानाही उपनेते अनिल राठोड व शहरप्रमुख दिलीप सातपुते यांना बाजुला ठेवत संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर व काही नगरसेवकांनी राष्ट्रवादीची व आ. संग्राम जगताप यांची मदत मिळविण्याचा प्रयत्न केला. परंतु या महाविकास आघाडीच्या प्रयोगालाही शिवसेनेतील अंतर्गत गटबाजीचा फटका बसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

अवघ्या चार महिन्यांपुर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार अनिल राठोड यांचा राष्ट्रवादीचे उमेदवार संग्राम जगताप यांनी सलग दुसर्‍यांदा पराभव केला होता. त्यानंतर या पोटनिवडणुकीतही शिवसेनेच्या उमेदवाराचा झालेला पराभव हा शिवसेनेसाठी सलग दुसरा धक्का आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post