पुणे- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या जीवाला धोका असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याबाबत पुण्यातील शिवाजीनगर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते लक्ष्मीकांत खांबिया यांनी ही तक्रार दाखल केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते लक्ष्मीकांत खांबिया यांनी शरद पवार यांच्या जीवाला धोका असल्याची लेखी तक्रार पुण्यातील शिवाजीनगर पोलीस स्टेशनला दिली. काही वेबपोर्टलवरुन शरद पवार यांच्याविरोधात चिथावणीखोर भाषणांचे व्हिडीओ टाकले जात आहेत. त्याखाली शरद पवार यांच्याविरोधात टोकाच्या कमेंट केल्या जात असल्याचे खांबिया यांनी म्हटलंय. या कमेंटवरुन शरद पवार यांच्या हत्येचा कट रचला जात असल्याचा आरोप लक्ष्मीकांत खांबिया यांनी केला आहे.
''गेले अनेक महिने समाज माध्यमांवर टोकाच्या विद्वेशाची भावना पसरवणे, तसेच जातीय तणाव निर्माण करून महाराष्ट्राच्या सामाजिक व राजकीय एैक्याला तडा जातील, अशा अनेक पोस्टर सोशल मीडियावर पाहत आहे. राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीचे राजकारण थांबल्यानंतर हा प्रकार कमी होईल, असं वाटत होतं. त्यामुळे याकडे फारसे गांभीर्याने पाहिले गेले नाही. मात्र, महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यावर पत्रकार भाऊ तोरसेकर, घनश्याम पाटील आणि इतर लोक सातत्याने यू ट्यूब, पोस्टमन पोर्टल, थिंकटॅक या चॅनेलवरपोस्ट केलेल्या व्हिडिओमधील भाषणे पाहिली तर तरुणांमध्ये व समाजात शरद पवार यांना संपवले पाहिजे, बॉम्ब व गोळ्यांचा वापर केला पाहिजे, अशी चिथावणीखोर वक्तव्ये केल्याचे निदर्शनास आल्याचे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते लक्ष्मीकांत खाबिया यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.''