माय अहमदनगर वेब टीम
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत श्रीराम मंदिर निर्मितीबाबत निवेदन करताना महत्त्वाची घोषणा केली आहे. अयोध्येत राम मंदिराची निर्मिती लवकरच सुरू होणार असून त्यासाठी श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टची स्थापना करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत दिली. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. हे ट्रस्ट स्वायत्तपणे काम करणार असून भव्य आणि दिव्य अशा राम मंदिराच्या निर्माणासाठी या ट्रस्टकडे ६७ एकर जमीन हस्तांतरित करण्यात येणार असल्याची माहितीही पंतप्रधानांनी दिली.
भारताच्या ऑक्सिजनमध्ये, आदर्शांमध्ये आणि मर्यांदांमध्ये भगवान श्रीराम आहेत, तसेच अयोध्येचे ऐतिहासिक महत्त्व काय आहे हे आपण सर्वजण जाणतोच, असे सांगत अयोध्येत भगवान श्रीराम यांच्या भव्य आणि दिव्य मंदिराच्या निर्मितीचा निर्णय घेण्यात आल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले. वर्तमान आण भविष्यात रामलल्लाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या आणि त्यांची श्रद्धा पाहूनच हा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. अयोध्या कायद्यांतर्गत अधिग्रहण केलेली सर्व ६७ एकर जमीन श्रीराम जन्मभूमी तीर्थश्रेत्राकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचेही ते पुढे म्हणाले.
Post a Comment