राष्ट्रीय लोक अदालतीत अठरा कोटीहून अधिक रक्कम वसुल
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर – जिल्हा न्यायालयात होणाऱ्या लोकअदालतींच्या माध्यमातून जास्तीतजास्त खटले निकाली काढण्यासाठी जिल्हा विधीसेवा प्राधिकरण चांगले प्रयत्न करत आहेत. यासठी तडजोडीला प्राध्यान्य देत आहेत. वकील व पक्षकार यांच्या सकारात्मक भुमिकेमुळे नगर जिल्हा न्यायालयाची कार्यक्षमता उंचावत आहे. लोकन्यायालयाच्या यशस्वीतेत वकील व पक्षकारांचेच खरे श्रेय आहे, असे प्रतिपादन प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीकांत आणेकर यांनी केले.
जिल्हा विधिसेवा प्राधिकरण व वकील संघटनांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा न्यायालयात व तालुका स्तरावर प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणाचे राष्ट्रीय लोकअदालतचे आयोजन प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीकांत आणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. राष्ट्रीय विधिसेवा प्राधिकरणाच्या ‘न्याय सबके लिये ....’ या जनजागृतीच्या गीताने राष्ट्रीय लोकअदालतीस सुरवात करण्यात आली. यावेळी जिल्हा सरकारी वकील सतीश पाटील, जिल्हा विधीसेवा प्राधिकरणाचे सचिव न्या. सुनीलजीत पाटील, शहर वकील संघटनेचे अध्यक्ष अॅड. भूषण बऱ्हाटे, सेन्ट्रल बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. सुभाष काकडे आदींसह सर्व न्यायाधीश, वकील वर्ग, न्यायालयीन कर्मचारी उपस्थित होते. न्या. अशोककुमार भिलारे व न्या. सुनीलजीत पाटील यांनी सर्व पॅनला भेट देऊन पाहणी केली.
सायंकाळ पर्यंत चालेल्या या लोकअदालातीत १३१९८ प्रलंबित प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यापैकी १२६२ प्रकरणे तडजोडीने मिटली असून ११,६०,०७,२२८ एवढी रक्कम वसूल करण्यात आली. तसेच ठेवण्यात आलेल्या २१७७१ खटलापूर्व प्रकरणांपैकी ४००८ प्रकरणे तडजोडीने मिटवण्यात आली असून ७,२६,३०,५९८ एवढी रक्कम वसूल करण्यात आली. तडजोडीने निकाली निघालेल्या एकूण ५२७० प्रकारणांमध्ये एकूण १८,८६,३७,८२६ ( अठरा कोटी सहाऐंशी लाख सदोतीस हजार आठशे सव्हीस ) एव्हढी रक्कम वसूल करण्यात आली आहे.
प्रास्ताविकात जिल्हा विधीसेवा प्राधिकरणाचे सचिव न्या. सुनीलजीत पाटील म्हणाले, समाजात शांतता व सुव्यवस्था राहण्यासाठी तसेच आपापसातील वाद, खटले सामुपचाराणे मिटण्यासाठी जिल्हा विधिसेवा प्राधिकरणाच्या माध्यमातून राष्ट्रीय लोकअदालातींचे आयोजन करण्यात येत असते. २०२० या नव्या वर्षातील हे पहिले लोकअदालत आहे. या आधी झालेल्या लोकअदालतींना चांगला प्रतिसाद मिळाला आहे. पक्षकरांच्या सोयीसाठी सुटसुटीत आखणी करण्यात आली आहे.
अॅड. भूषण बऱ्हाटे म्हणाले, जिल्हा न्यायलयात होणाऱ्या सर्व लोकअदालतींना सर्व वकिलांचे उत्फूर्त सहकार्य असते. पक्षकारांनी या लोकअदालतचा लाभ घेवून आपली प्रलंबित प्रकरणे मार्गी लावावीत.
अॅड. सुभाष काकडे म्हणाले, प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीकांत आणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आज पर्यंत झालेल्या लोक अदालतींमध्ये जास्तीतजास्त प्रकरणे मार्गी लागली असल्याने नगरचे जिल्हा न्यायालय महाराष्ट्रात अव्वल राहिले आहे. याबद्दल न्या. आणेकर यांचे अभिनंदन.
लोकअदालातीच्या यशस्वीते साठी जिल्हा विधिसेवा प्राधिकरणाचे प्रबंधक विकास जोशी, नरेंद्र देशमुख आदींसह कार्माचारींनी तसेच विधी स्वयंसेवकांनी परिश्रम घतले. या लोक अदालतीस आलेल्या सर्व पक्षकारांसाठी नोटरी पब्लिक असोसिएशनच्या वतीने अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली होती.
Post a Comment