'ही' निवडणुक 6 महिने लांबणीवर




माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर- भिंगार येथील अहमदनगर कॅन्टोन्मेंट बोर्डाची निवडणुक 6 महिने पुढे ढकलण्यात आली आहे. तसेच विद्यमान सदस्यांना मुदतवाढ देण्यात आली आहे. याबाबतचा आदेश केंद्रिय संरक्षण मंत्रालयाचे उपसंचालक राजेशकुमार शाह यांनी बुधवारी (दि.5) सायंकाळी कॅन्टोन्मेंट कार्यालयाला पाठविला आहे.

देशभरातील 55 कॅन्टोन्मेंट बोर्डांच्या विद्यमान सदस्यांना सहा महिन्यांची मुदतवाढ देण्याचा आणि या सर्व कॅन्टोन्मेंट बोर्डांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय केंद्रिय संरक्षण मंत्रालयाने घेतला आहे. कॅन्टोन्मेंट बोर्ड कायदा 2006 च्या उपकलम 1 च्या भाग 14 अन्वये ही मुदतवाढ देण्यात आल्याचे संरक्षण मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे देशभरातील 55 कॅन्टोन्मेंट बोर्डांच्या बरोबरच भिंगार कॅन्टोन्मेंट बोर्डाची निवडणुक लांबणीवर गेली आहे. केंद्र सरकारच्या संरक्षण खात्याच्या अखत्यारीत असलेल्या भिंगार कॅन्टोन्मेंट बोर्डात एकूण 14 सदस्य आहेत. त्यामध्ये लष्करातील 5 सदस्य हे पदसिध्द असतात. याशिवाय मंडळाचे अध्यक्ष ब्रिगेडीयर असतात तर मुख्य कार्यकारी अधिकारी हे संरक्षण विभाग नियुक्त असतात. उर्वरीत 7 सदस्य हे जनतेमधुन सार्वत्रिक निवडणुकीद्वारे निवडले जातात. या जनतेतुन निवडलेल्या सदस्यांपैकी एका सदस्याला उपाध्यक्ष पदाची संधी मिळते.

बोर्डाच्या विद्यमान सदस्यांची मुदत जानेवारीमध्येच संपुष्टात आलेली आहे. तत्पुर्वी निवडणुकीची प्राथमिक प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. 16 डिसेंबर 2019 रोजी महिलांसाठी आरक्षित प्रभागांची सोडतही पार पडलेली आहे. या सोडतीत प्रभाग क्र. 4 व 6 हे महिलांसाठी राखीव झालेले आहेत. आरक्षण सोडतीनंतर निवडणुकी बाबतच्या पुढील आदेशाची प्रतिक्षा होती. मात्र दोन महिन्यात कोणतेही आदेश प्राप्त झाले नाहीत. त्यानंतर बुधवारी (दि.5) सायंकाळी कॅन्टोन्मेंट बोर्ड निवडणुक 6 महिने पुढे ढकलल्याचे आदेश बोर्ड कार्यालयास प्राप्त झाले आहेत. ही निवडणुक लांबणीवर पडल्याने निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांचा हिरमोड झाला आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post