चीनमधून आलेल्या व्यक्तींना भेदभावाची वागणूक देऊ नये - आरोग्यमंत्री राजेश टोपे


माय अहमदनगर वेब टीम
मुंबई : राज्यात कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर राज्यामध्ये आज 5 जणांना रुग्णालयात निरीक्षणाखाली दाखल करण्यात आले आहे. पुणे येथे तीन जणांना तर अहमदनगर व जळगाव येथे प्रत्येकी एक जण भरती करण्यात आला आहे. आतापर्यंत राज्यामध्ये 25 जणांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. दरम्यान, कोरोनासंबंधी सोशल मीडियावर विविध अफवा पसरविल्या जात आहे. त्यावर विश्वास ठेवू नये, चीन व कोरोना बाधित भागातून आलेल्या व्यक्तींना भेदभावाची वागणूक देऊ नये, असे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज केले.

कोरोनाबाधित भागातून येणाऱ्या व्यक्तींना कामावर रुजू करुन घेताना त्यांच्याकडे वैद्यकीय प्रमाणपत्र किंवा प्रयोगशाळा अहवालाची मागणी केली जाते. हे चुकीचे आहे. अशा व्यक्तींची आरोग्य विभागामार्फत 14 दिवसांपर्यंत दैनंदिन सर्वेक्षण केले जाते. या काळात कोणतीही लक्षणे न आढळलेल्या व्यक्तींना तपासणीची गरज नाही. त्यांच्याकडे वैद्यकीय प्रमाणपत्र मागू नये असे आवाहनदेखील आरोग्यमंत्र्यांनी केले आहे.

18 जानेवारी पासून ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळल्याने राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात आतापर्यंत 30 जणांना भरती करण्यात आले आहे. यातील 5 प्रवासी आज भरती झाले आहेत. यातील 3 जण नायडू रुग्णालयात तर प्रत्येकी 1 जण जिल्हा रुग्णालय अहमदनगर आणि जळगाव येथे भरती करण्यात आला आहे. आतापर्यंत 25 जणांचे प्रयोगशाळा नमुने निगेटिव्ह आल्याचे एनआयव्ही पुणे यांनी कळविले आहे. आज भरती झालेल्या पाचहीजणांचे नमुने आज प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले असून त्यांचे अहवाल उद्यापर्यंत प्राप्त होतील. आज नायडू रुग्णालयात भरती झालेल्या 3 रुग्णांपैकी एक चिनी नागरिक आहे.
अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन
सोशल मीडिया वर कोरोनाविषयी विविध अफवा पसरत आहेत, त्यावर विश्वास ठेवू नये. विशेषतः चिकन खाल्ल्याने किंवा मांसाहार केल्याने कोरोनाची बाधा होऊ शकते असे संदेश फिरताना दिसत आहेत. या प्रकारच्या संदेशामध्ये काहीही तथ्य नाही. आरोग्याच्या दृष्टीने मांसाहार करताना तो पूर्णपणे शिजलेला असावा, कच्चे किंवा अर्धवट शिजलेले मांस खाऊ नये, हे महत्त्वाचे आहे. सोशल मीडियावरील प्रत्येक बाबीची अधिकाधिक स्त्रोतांमार्फत खातरजमा करावी, असेही आवाहन विभागामार्फत करण्यात येत आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post