रॅगिंगला कंटाळून भावी डॉक्टरची आत्महत्या



माय अहमदनगर वेब टीम
बीड -शाळेत असल्यापासून डॉक्टर होण्याचे स्वप्न, त्यासाठी अभ्यास केला, एमबीबीएसला नाही पण बीएएमएसला उदगीरच्या धन्वंतरी आयुर्वेद महाविद्यालयात प्रवेश मिळाला. उत्साहात प्रवेश घेतला खरा, पण काही दिवसांत ‘तू तर खेडूत, तू काय होणार डॉक्टर’ असे म्हणत रॅगिंग सुरू झाली अन् डॉक्टर होण्याच्या उत्साहाची जागा रॅगिंगच्या भीतीने घेतली. महाविद्यालय सोडून तो दोन वेळा घरी आला. पालकांनी, महाविद्यालयात प्रश्न मांडला. शनिवारी (दि. ९) पुन्हा महाविद्यालयात जायचे म्हणून त्याने रात्रीच घरात विष घेतले अन् शेतात जाऊन झाेपला तो कायमचाच. डॉक्टर होण्याचे स्वप्न रंगवणाऱ्या गणेश कैलास म्हेत्रे (२०, रा. नाळवंडी, ता. बीड) या शेतकरी पुत्रावर रॅगिंगमुळे ही आत्महत्येची वेळ आली.

बीड शहराजवळ असलेल्या नाळवंडी गावचा गणेश म्हेत्रे लहानपणापासून शाळेत हुशार, सतत अभ्यासात असल्याने गावातही त्याला मोजकेच मित्र, मित्रांतही फार काही रमायचा नाही. त्यामुळे काहीसा अबोल, लाजाळू आणि इतरांत लवकर न मिसळता आपण भले अन् काम भले या वृत्तीचा. एकत्रित कुटुंबात चार चुलते सर्वजण शेतीच करतात. तर इतर चुलत भाऊ, बहिणींमध्ये गणेश मोठा. डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहत त्याने दहावी, बारावी गावातच पूर्ण केली. नीटचा अभ्यास केला, पण एमबीबीएसला प्रवेश मिळण्याइतपत गुण मिळाले नाहीत, पण उदगीर येथील धन्वंतरी आयुर्वेदिक महाविद्यालयात बीएएमएस (प्रथम वर्ष) अभ्यासक्रमाला त्याला प्रवेश मिळाला. त्यानेही प्रवेश घेतला. मात्र, खेडूत असण्याने, लाजाळू असल्याने त्याच्या साधेपणाचा गैरफायदा घेत महाविद्यालयातील इतर विद्यार्थ्यांकडून त्याला हिणवले जाऊ लागले.त्याचा मानसिक छळ केला जाऊ लागला. काही दिवस त्याने सहन केले. मात्र, अखेर वैतागून त्याने हा प्रकार कुटुंबीयांना सांगितला.


0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post