अखेर 'त्या' जळीतकांडातील पीडितेची मृत्यूशी झुंज अपयशी
माय अहमदनगर वेब टीम
नागपूर - वर्ध्यामधील हिंगणघाट येथील प्राध्यापक तरुणीला एका नराधमाने जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. यामध्ये ती 40 टक्के भाजली होती. नागपुरातील ऑरेंज सिटी रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू होते. मात्र तिची मृत्यूशी असलेली झुंज अखेर संपली. आज सकाळी 6.55 वाजता हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले.
संसर्गामुळे रक्तपेशी, रक्तातील ऑक्सिजनची कमतरता, मेंदू - फुफ्फुसावर झाला परिणाम
हृदयविकाराचा झटका आल्यानंतर तरुणीला औषधे देऊन हृदयाचे ठोके आणि रक्तदाब वाढवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली. रात्रभर तिला वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात होते. मात्र संसर्गामुळे रक्तपेशी, रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाले. याचा तिच्या मेंदू, फुफ्फुसांवरही परिणाम झाला होता अशी माहिती डॉक्टरांनी दिली. पीडितेचे पार्थिव पोलिसांकडे लवकरच सुपूर्द केले जाणार आहे. गेल्या आठ दिवसांपासून ती मृत्यूशी झुंज देत होती. सोमवारी सकाळी नागपुरच्या ऑरेंज सिटी रुग्णालयात तिने अखेरचा श्वास घेतला. विकी नगराळे या नराधमाने तिच्यावर पेट्रोल टाकून तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला होता.
3 फेब्रुवारी रोजी सकाळी साडे सात वाजता ही तरुणी महाविद्यालयाकडे निघाली होती. दरम्यान तिच्या अंगावर पेट्रोल ओतून एका नराधमाने भररस्त्यात पेटवून दिले होते. तरुणीला पेटवल्याचे पाहताच काही शाळकरी मुलींनी आरडाओरड करत जवळपासच्या लोकांना मदतीची याचना केली. त्या वेळी नागरिकांनी तत्काळ तरुणीच्या अंगावर पाणी ओतून आग विझवली. या घटनेमध्ये ही तरुणी 40 टक्के भाजली होती. नागपुरातील ऑरेंज सिटी रुग्णालयात ती मृत्यूशी झुंज देत होती.
Post a Comment