न्यूझीलंडने वनडेत आपले सर्वात मोठे लक्ष्य गाठले


माय अहमदनगर वेेेब टीम
हॅमिल्टन - टी-२० मालिकेत पराभूत झाल्यानंतर न्यूझीलंडने वनडे मालिकेत विजयी सुरुवात केली. न्यूझीलंडने पहिल्या वनडेत भारताला ४ गड्यांनी मात दिली. यजमान संघाने ३ सामन्यांच्या मालिकेत १-० ने आघाडी घेतली. मालिकेतील दुसरा वनडे ८ फेब्रुवारी रोजी ऑकलंडमध्ये खेळवला जाईल. भारताने प्रथम खेळताना ४ बाद ३४७ धावा उभारल्या. न्यूझीलंडने ४८.१ षटकांत ४ गडी गमावत विजयी लक्ष्य गाठले. न्यूझीलंडने वनडेतील आपले सर्वात मोठे लक्ष्य गाठले. यापूर्वी त्यांनी २००७ मध्ये याच मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्ध ३४७ धावांचे लक्ष्य गाठले होते. न्यूझीलंडने सलग दुसऱ्या वनडेत भारताला पराभूत केले. यापूर्वी गतवर्षी विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत नमवले होते. हा भारताविरुद्ध वनडेतील दुसरा यशस्वी पाठलाग ठरला. यापूर्वी ऑस्ट्रेलियाने गेल्या मार्चमध्ये मोहालीत ३५९ धावांचे लक्ष्य गाठले होते. न्यूझीलंडने हॅमिल्टनमध्ये सलग पाचव्या वनडेत धावांचा पाठलाग करताना विजय मिळवला होता.


अय्यरचे पहिले वनडे शतक
श्रेयस अय्यरने आपल्या करिअरमधील पहिले शतक झळकावले. त्याचा हा १६ वा सामना होता. अय्यरने राहुलसोबत चौथ्या विकेटसाठी १३६ धावांची भागीदारी केली. राहुलने वनडेत आपले सातवे आणि कोहलीने ४४ वे अर्धशतक झळकावले. कोहलीने अय्यरसोबत १०२ धावांची भागीदारी केली. त्याला ईश सोढीने त्रिफळाचीत केले. पृथ्वी शॉ २० आणि मयंक अग्रवाल ३२ धावांवर परतले. दोघांनी पहिल्या गड्यासाठी ५० धावांची भागीदारी रचली. पृथ्वी आणि मयंकने वनडेत पदार्पण केले.

रॉस टेलरचे एका वर्षानंतर शतक
रॉस टेलरने करिअरमधील २१ वे शतक लगावले. तो १०९ धावांवर नाबाद राहिला. टेलरने एका वर्षानंतर शतक झळकावले. गेल्या वर्षी ८ जानेवारी रोजी श्रीलंकेविरुद्ध १३७ धावा काढल्या हाेत्या. कर्णधार टॉम लाथमने ४८ चेंडूंवर ६९ धावा काढल्या. हेन्री निकोल्सने ७८ धावांची खेळी केली. मार्टिन गुप्टिलने ३२ धावा केल्या. टेलर व लाथमने चौथ्या गड्यासाठी १३८ धावांची भागीदारी रचली.

तिसऱ्यांदा नंबर चारच्या फलंदाजांचे शतक
वनडेमध्ये तिसऱ्यांदा दोन्ही संघांकडून नंबर चारच्या फलंदाजांनी शतके झळकावली. अय्यर (१०३) व टेलर (१०९*) यांनी अशी कामगिरी केली. यापूर्वी २००७ मध्ये द. आफ्रिकेच्या डिव्हिलर्स (१०७) व झिम्बाब्वेच्या तातेंदा तैबू (१०७) यांनी अशी कामगिरी केली.

सात वर्षांनी एका लढतीत २०+ वाइड चेंडू टाकले
या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी २४ वाइडसह २९ अतिरिक्त धावा दिल्या. २०१३ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वाँडरर्स सामन्यानंतर सर्वधिक वाइड टाकले होते. नंबर जसप्रीत बुमराहने १० षटकांत १३ वाइडसह ५३ धावा दिल्या. मो. शमीने ७, शार्दूल ठाकूरने २, रवींद्र जडेजाने १ वाइड आणि कुलदीप यादवने एक वाइड चेंडू टाकला.

कोहली कर्णधार म्हणून धावांत गांगुलीच्या पुढे
कोहलीने सौरव गांगुलीला मागे सोडले. कोहलीने आता कर्णधार म्हणून ८७ सामन्यांत ७६.४६ च्या सरासरीने ५१२३ धावा काढल्या. गांगुलीच्या १४८ वनडेत ५०८२ धावा होत्या. धोनी (६६४१) पहिल्या स्थानी व अजहर ५२३९ धावांसह दुसऱ्या स्थानी आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post