शिंदेंचा आक्षेप, पवारांना समन्स
माय अहमदनगर वेब टीम
मुंबई- राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे नातू आणि राष्ट्रवादीचे कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांना मुंबई उच्च न्यायालयानं समन्स बजावलं आहे. विधानसभा निवडणुकीत रोहित पवार यांनी गैरमार्गांचा वापर केल्याचा आरोप करणारी याचिका माजी मंत्री आणि भाजपा नेते राम शिंदेंनी न्यायालयात दाखल केली आहे. आता न्यायालयानं या प्रकरणावर रोहित पवार यांना समन्स बजावत त्यांना 13 मार्चपर्यंत बाजू मांडण्याचे आदेश दिले आहेत.
कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात रोहित यांच्याविरोधात पराभूत झालेल्या राम शिंदेंनी याचिकेत काही आरोप केले आहेत. रोहित पवार यांनी निवडणुकीच्या नियमांचा भंग केल्याचं त्यांनी याचिकेत म्हटलं आहे. या याचिकेत शिंदे म्हणतायेत, निवडणूक काळात रोहित पवार यांनी स्वतःची मालकी असलेल्या साखर कारखान्यातल्या 100 कर्मचार्यांचा वापर केला. यातील काही कर्मचार्यांना आपण रंगेहात पकडून निवडणूक प्रक्रियेशी संबंधित अधिकार्यांच्या ताब्यात दिलं होतं असा दावाही राम शिंदेंनी सदर याचिकेत नमूद केलं असल्याची माहिती आहे. व्हॉट्स अपच्या माध्यमातून प्रचार करत मतदारांना प्रभावित केल्याचा आरोपदेखील राम शिंदे त्यांनी या याचिकेत केला असल्याची माहिती आहे.
या याचिकेतील विशेष बाब म्हणजे सदर याचिकेत अनेक ठिकाणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि रोहित पवार यांचे आजोबा शरद पवार यांच्या नावाचादेखील उल्लेख असल्याचं वृत्त मराठी वृत्त वाहिनीने दिलं आहे. अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेल्या कर्जत जामखेड विधानसभा निवडणुकीत रोहित पवार यांनी राम शिंदे यांचा पराभव केला होता. टीका टिपण्णी आणि आरोप प्रत्यारोपांनी गाजलेली कर्जत जामखेडची निवडणूक गाजली होती.
रोहित पवार यांना कर्जत जामखेड मतदारसंघातून 1 लाख 34 हजार 848 मतं मिळाली. तर राम शिंदे यांना 91 हजार 815 मते मिळाली. रोहित पवार यांनी राम शिंदेंना 43 हजार 947 मताधिक्यांनी पराभूत केले.
Post a Comment