‘मनसे’त मेगाभरती


माय अहमदनगर वेब टीम
मुंबई : मुंबई आणि देशभरात घुसलेल्या बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोरांविरोधात मनसेने रविवारी महामोर्चा आयोजित केला आहे. दरम्यान, या महामोचार्पूर्वी मनसेमध्ये मोठय़ा प्रमाणावर ‘इनकमिंग’ला सुरुवात झाली आहे. कृष्णकुंजवर राज ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेनेचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव आणि प्रमोद महाजन यांचे बंधू प्रकाश महाजन यांनी शनिवारी मनसेत प्रवेश केला.

दरम्यान, औरंगाबादचे शिवसेनेचे लोकसभा सहसंपर्कप्रमुख सुहास दशरथे आणि नांदेडचे माजी जिल्हाप्रमुख प्रकाश कौडगे यांनीही यावेळी मनसेत प्रवेश केला. पक्षप्रवेशानंतर मराठवाडय़ात जोमाने कामाला लागणार असल्याचे सांगतानाच, जाधव यांनी शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांच्यावर टीकेची तोफ डागली. चंद्रकांत खैरे हे आयुष्यात पुन्हा कधीही खासदार होणार नाहीत, असे भाकीतही त्यांनी वर्तवले. हर्षवर्धन जाधव हे २००९ साली मनसेच्या तिकिटावर विधानसभेत निवडून गेले होते. त्यानंतर त्यांनी मनसेला रामराम ठोकून शिवसेनेत प्रवेश केला.

मधल्या काळात अंतर्गत वादामुळे शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ त्यांनी स्वत:चा पक्ष काढला. तसेच, औरंगाबादमधून अपक्ष म्हणून लोकसभा निवडणूक लढवली. त्यात त्यांचा पराभव झाला खरा, मात्र त्यांनी तीन लाखांच्या जवळपास मते घेतली. त्यांच्या या मुसंडीमुळे शिवसेनेचे दिग्गज नेते खैरे यांचा पराभव झाला आणि एमआयएमचा उमेदवार निवडून आला. तेव्हापासून खैरे व जाधव यांच्यात वितुष्ट आले आहे. दोघेही एकमेकांवर टीकेची एकही संधी सोडत नाहीत.

जाधव यांनी मनसेत प्रवेश केल्यानंतर याचीच प्रचिती आली. खैरे यांच्याबद्दल प्रश्न विचारताच जाधव यांनी त्यांच्यावर टीकास्त्र सोडले. खैरे यांनी माझ्यावर व्यक्तिगत टीका करणे थांबवावे आणि त्यांनी खासदारकीची स्वप्ने आता सोडून द्यावी. ते आता पुन्हा कधीही खासदार होणार नाही, असेही जाधव यांनी ठणकावले.

मनसेत पुन्हा प्रवेशाबद्दल बोलताना ते म्हणाले, मधल्या काळात मी थोडा विचलित झालो होतो. काही गैरसमज होते. ते दूर झाले आहेत. मनसे योग्य मार्गाने चालली आहे. मनसेचा हिंदुत्वाचा मुद्दाही योग्य आहे. मुंबईतील मोर्चातही मी रविवारी सहभागी होणार आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post