करोनाबाबतचे व्हायरल मेसेज खोटे
माय अहमदनगर वेब टीम
मुंबई - 'लसणाच्या पाकळ्या, कढीपत्त्याची पाने, गोमूत्र यांमुळे करोना व्हायरसवर उपचार शक्य आहे,' असे संदेश डॉक्टरांच्या नावासह व्हॉट्सअॅपवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. मात्र व्हायरल होणारे हे संदेश खोटे असून या संदेशावर नागरिकांनी विश्वास ठेवू नये, असे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.
करोना आजारावर अद्याप कोणतेही रामबाण औषध नाही. अशा प्रकारचा दावा करणारे जे मेसेज व्हायरल होत आहेत, त्यात तथ्य नाही. यापूर्वी स्वाइन फ्लू, इबोला साथींच्या वेळी असे दिशाभूल करणारे मेसेज व्हायरल झाले होते. यावर सामान्यांनी विश्वास ठेवू नये. कोणतेही पदार्थ खाण्यावरही निर्बंध नाहीत. मात्र अन्न ताजे, स्वच्छ, पूर्ण शिजवलेले खावे असे संसर्गजन्य साथरोग नियंत्रण विभागाचे प्रमुख डॉ. प्रदीप आवटे यांनी माध्यमाशी बोलताना सांगितले.
आरोग्य विभागाच्या संचालक डॉ. अर्चना पाटील यांनीही या मेसेजना कोणताही शास्रीय आधार नाही, लक्षणांवर उपचार केले जात आहेत. रोगप्रतिकारशक्ती उत्तम ठेवणे, पोषक आहार घेणे महत्त्वाचे आहे, असे स्पष्ट केले.
Post a Comment