गुड न्युज ; पहिल्या बाधित रुग्ण कोरोनामुक्त




माय अहमदनगर वेब टीम
 अहमदनगर -  जिल्ह्यात आढळलेल्या पहिल्या बाधित रुग्णाचे 14 दिवसानंतरचे  दोन्ही अहवाल निगेटिव्ह आल्याने तो  कोरोनामुक्त झाल्याचे स्पष्ट झाल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे. त्या रुग्णाला आता आरोग्य यंत्रणेच्या तपासणी नंतर उद्या घरी सोडण्यात येणार आहे. त्याला घरीच आणखी 14 दिवस देखरेखीखाली ठेवण्यात येणार आहे. आरोग्य यंत्रणेच्या योग्य उपचारामुळे हा रुग्ण लवकर बरा होऊ शकला, ही अतिशय दिलासादायक बाब असल्याचे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी सांगितले. आपल्या आरोग्य यंत्रणेने अतिशय कष्ट घेतले. त्या रुग्णावर उपचार करणाऱ्या सर्व डॉक्टर्स, नर्सेस आणि वॉर्डबोय यांचे श्री. द्विवेदी यांनी कौतुक करत आभार मानले.

जिल्ह्यात पहिल्यांदा नगर शहरातील व्यक्तीला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे आढळून आले होते. त्यानंतर जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेने तात्काळ पावले उचलत त्या रुग्णाला जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. तसेच त्याचे स्त्राव नमुने चाचणीसाठी पुण्याच्या एनआयव्ही कडे पाठवले होते. त्या अहवालानंतर त्या व्यक्तीला कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यामुळे तात्काळ त्याला बूथ हॉस्पिटल येथे आयसोलेशन कक्षात ठेवण्यात आले. तेथे त्याच्यावर उपचार सुरू होते. दिनांक २७ मार्च रोजी १४ दिवस पूर्ण झाल्यानंतर त्याचा स्त्राव पुन्हा तपासणीसाठी पुण्याला पाठविण्यात आला. तो अहवाल निगेटीव्ह आल्यानंतर पुन्हा दुसरा स्त्राव चाचणीसाठी पाठविण्यात आला होता. तो अहवाल आज प्राप्त झाला. हा अहवाल निगेटिव्ह आल्याने हा रुग्ण कोरोनातून बरा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. ही अतिशय दिलासादायक बाब असल्याचे जिल्हाधिकारी श्री. द्विवेदी यांनी सांगितले.

दरम्यान आतापर्यंत जिल्ह्यातील  297 व्यक्तींची तपासणी करण्यात आली असून 30 व्यक्तींना आरोग्य यंत्रणेच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. एनआयव्हीकडे 269 जणांचे स्त्राव नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते त्यातील 245 जणांचे स्त्राव नमुने निगेटिव आल्याने त्यांना घरीच देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. सध्या घरीच देखरेखीखाली असणाऱ्या व्यक्तींनी संख्या आता 374 झाली आहे, असे जिल्हाधिकारी  द्विवेदी यांनी सांगितले.

कोरोना संसर्गाचा  प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा अधिक सतर्क झाली आहे. त्यामुळे बाह्यरुग्ण तपासणी साठी येणाऱ्या व्यक्तींमध्येही या आजाराची लक्षणे बाह्य स्वरूपात दिसून येत असतील तर त्याचीही तपासणी करून त्यांना घरीच देखरेखीखाली ठेवण्यात येत आहे.

कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी  जिल्हा प्रशासन, आरोग्य यंत्रणा आणि जिल्हा पोलीस दल प्रयत्न करीत आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाने आवश्यक प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. प्रत्येक नागरिकाने या विषाणू संसर्गाचा धोका ओळखावा आणि सामाजिक बांधिलकी म्हणून तसेच स्वताच्या व समाजाच्या आरोग्यासाठी घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.  

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post