दिलासादायक : देशातील पहिले दोन रुग्ण ‘कोरोना’मुक्त


माय अहमदनगर वेब टीम
मुंबई : देशातील पहिले ‘कोरोना’बाधित रुग्ण म्हणून उपचार घेत असलेले पुण्यातील दोन जण आज गुढीपाडव्याला ‘कोरोना’मुक्त होऊन घरी परतत असल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आनंद व्यक्त केला आहे. होळीला कोरोनाबाधित ठरलेले हे दोघे आज गुढीपाडव्याला कोरोनामुक्त झाल्याचे सांगून या रुग्णांवर तसेच राज्यातील विविध रुग्णालयात ‘कोरोना’बाधितांवर उपचार करणाऱ्या वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांचे त्यांनी आभारही मानले आहेत.
राज्यात संचारबंदी असली तरी जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा नियमित सुरु आहे. दूध, भाजीपाला, फळे, औषधे, अन्नधान्याची कुठलीही टंचाई नाही. जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सरकार सर्वकाळ नियमित ठेवेल, असा विश्वास देतानाच नागरिकांनी खरेदीसाठी गर्दी करु नये, नागरिकांनी खरेदी करताना सुरक्षित अंतराची मर्यादा स्वत:हून पाळावी, असं आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी केलं आहे.
अत्यावश्यक कारणांशिवाय घराबाहेर पडणाऱ्यांवर पोलिस कारवाई करतीलंच, परंतु जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्यांना कोणताही त्रास होणार नाही, याची दक्षता घेण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले. जीवनावश्यक वस्तूंचा अवैध साठा आणि चढ्या दराने विक्री करणाऱ्यांवर गुन्हे नोंदवून कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
सांगली जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांमध्ये 5 ने झालेली वाढ आणि राज्यातील रुग्णांची संख्या 112 वर पोहचणं गंभीर आहे. नागरिकांनी आता स्वयंशिस्त आणि संयम पाळून घरातच थांबावं, असं आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा केलं आहे.
अमेरिकेनं ‘लॉकडाऊन’च्या अंमलबजावणीसाठी लष्कराची मदत घेतली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील जनतेनं अत्यावश्यक गरजेशिवाय घराबाहेर पडणं टाळावं, असंही आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी केलं आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post