कोरोनाविरुद्धची लढाई अजून संपलेली नाही; कुणाचाही पगार कापला जाणार नाही - मुख्यमंत्री
माय अहमदनगर वेब टीम
मुंबई - लॉकडाउनचा सातवा किंवा आठवा दिवस निघून गेला ती कल्पनाही आलेली नाही. लढाई अजूनही सुरु आहे. जसे जसे दिवस जात आहेत तसे आपण आपली पकडही मजबूत करत आहोत. हाच तो काळ आहे ज्या काळात करोनाचा विषाणू गुणाकार सुरु करतो. आपण सगळे त्याला धैर्याने तोंड देत आहेत ही कौतुकाची बाब आहे. आपली लढाई अजून संपलेली नाही असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून त्यांनी जनतेशी संवाद साधला. आधीच करोनाचं संकट आहे आणि आज दुपारी अशी समजूत झाली की अनेकांचे पगार कापण्यात येतील. मात्र कुणाच्याही पगारात कपात केली जाणार नाही हे माझं आश्वासन आहे असंही त्यांनी म्हटलं आहे.
मात्र आज मी तुम्हाला ग्वाही देतो की कुणाचाही पगार कापला जाणार नाही. फक्त काही टप्प्यांमध्ये त्याची विभागणी होणार आहे. वेतन कपातीबाबत कोणताही निर्णय झालेला नाही असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे. मी परवा नायडू रुग्णालयातील डॉक्टरांशी बोललो. त्यांना जेव्हा मी पाहिलं तेव्हा मला ते एखाद्या सैनिकासारखे वाटले. करोना नावाच्या व्हायरसशी हे सगळे लढत आहेत. त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. अशावेळी करोनाने कितीही टकरा दिल्या तरी त्याचा पराभव होणारच हे लक्षात असूद्या असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. तसंच करोनाशी लढण्यासाठी इतके हात पुढे येत आहेत. मग कुणाचाही पगार कसा काय कापला जाईल? करोनाशी लढल्यानंतर आर्थिक संकट येणार आहे त्यामुळे टप्प्याटप्प्यात हा पगार दिला जाईल असं आश्वासन मी देतो असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.
Post a Comment