आज जनता कर्फ्यू : जनता कर्फ्यू का गरजेचा? ... असे समजून घ्या
माय अहमदनगर वेब टीम
नवी दिल्ली - देशात कोरोनाबाधितांची संख्या ३४५ वर पोहोचली आहे. शनिवारी नवे ८५ रुग्ण आढळून आले. देशात आतापर्यंत २३ रुग्ण पूर्णपणे बरे झाले असून कोराेनाचा हा वाढता संसर्ग रोखण्यासाठी रविवारी देशभर “जनता कर्फ्यू’ लागू असेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकांना सकाळी ७ ते रात्री ९ पर्यंत घरातच राहण्याचे आवाहन केले आहे. किराणा, आैषधी दुकाने व भाजीपालाची दुकाने सुरू राहणार आहेत. बहुतेक राज्यांनी रविवारी शटडाऊनची घोषणा केली असून यादरम्यान वाहतुकीची साधने बंद राहतील. मात्र, अगाेदरच निघालेल्या रेल्वे चालू राहतील. देशात एकूण ३७०० रेल्वेगाड्या रद्द झाल्या आहेत. गो-एअरने देशांतर्गत उड्डाणे बंद करण्याची घोषणा केली आहे. इंडिगोची ६०% विमानेच चालू राहतील. एअर विस्तारानेही काही उड्डाणे कमी केली आहेत.
देशात दोन दिवसांत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने केंद्रीय आरोग्य मंत्रालयानेही जय्यत तयारी केली असून मंत्रालयाने शनिवारी देशभर एक हजार ठिकाणी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून क्रिटिकल केअर मॅनेजमेंटचे प्रशिक्षण दिले. राजस्थान व छत्तीसगड राज्यात ३१ मार्चपर्यंत संपूर्ण लॉकडाऊन करण्यात आले आहे.
आज सायं. ५ वाजता टाळी वाजवून कृतज्ञता व्यक्त करा... पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आवाहन केले आहे की, कोरोनाच्या दहशतीतही आवश्यक सेवेत असलेल्या लोकांचे आभार माना, आपल्या दारात ५ मिनिटे टाळ्या, थाळी, घंटानाद करा. प्रशासनानेही या वेळी सायरन वाजवावा.
जनता कर्फ्यूमध्ये काय करावे?
1. आज आणि येत्या काही आठवड्यांत घराबाहेर पडू नका. इतर लोकांशी संपर्कात येणे टाळा. बाहेरील व्यक्तीस घरी बोलावू नका.
2. जेवढे शक्य आहे तेवढे घरातूनच काम करा. रुग्णालय, पाेलिस, अग्निशामक अशा अत्यावश्यक सेवेत असाल तर घरातील लोकांना भेटण्यापूर्वी स्वत:ला सॅनिटाइझ करा.
3. १० वर्षांखालील मुले आणि ६० वर्षांवरील वयस्करांनी काही आठवडे तरी घराबाहेर पडण्याचे कटाक्षाने टाळावे.
काय करू नये?
1. अत्यावश्यक सेवा, विशेषत: रुग्णालयांवर दबाव टाकू नका. डॉक्टरांना रुग्णांवर उपचार करताना ताण यायला नको. गरज पडलीच तर डॉक्टरांचा फोनवरच सल्ला घ्या.
2. घर किंवा सरकारी तसेच खासगी कार्यालयात काम करणाऱ्या लोकांनाही सोशल डिस्टन्सिंग शिकवावे. हे लोक कामावर येऊ शकत नसतील पगार कापू नका.
3. अफवांपासून दूर राहा. सोशल मीडियावरील तथ्यांश पडताळूनच फॉरवर्ड करा.
Post a Comment