माय अहमदनगर वेब टीम
सोलापूर - लाॅक डाऊनमुळे धुळखेड येथे कर्नाटकाच्या हद्दीत हरियाणा व राजस्थानचे अडीच हजार लोक गेल्या तीन दिवसापासून अडकून पडले होते. आज या सर्वांना कर्नाटक सरकारने ६२ एसटी बसची सोय करून महाराष्ट्राच्या हद्दीतून त्यांना त्यांच्या राज्यात पाठवले. याच ठिकाणी महाराष्ट्रातील जळगाव व नाशिक भागातील दोनशे ते तीनशे मजूर अडकून पडले होते. या सर्वांना मात्र तुमच्या हद्दीत गेल्यानंतर तुमची सोय होईल असे सांगून मालवाहतूक करणाऱ्या उघड्या ट्रकमधून पाठवले. या घटनेतून कर्नाटक सरकारने महाराष्ट्राच्या जनतेविषयी दुजाभाव केल्याचे दिसून आले.
सोलापूर- विजयपूर महामार्गावर टाकळी येथील भीमानदी जवळ महाराष्ट्र व कर्नाटकची हद्द आहे. दोन दिवसापूर्वी कर्नाटकच्या हद्दीतून राजस्थान वा हरियाणाचे चार कंटेनर भरून लोक महाराष्ट्राच्या हद्दीत आले होते. त्यावेळी संचारबंदी असल्याने मंद्रुपचे सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप धांडे यांनी सर्व कंटेनर परत कर्नाटक हद्दीत पाठविले होते. तेव्हापासून कर्नाटक हद्दीतील धुळखेड येथे हरियाणा व राजस्थानसह महाराष्ट्रातील अनेक जण अडकून पडले होते. कर्नाटक- महाराष्ट्र हद्दीवर लोक अडकून पडण्याची माहिती राजस्थान सरकारला समजली. दोन्ही राज्यातील अधिकाऱ्यांशी चर्चा झाली. त्यानंतर कर्नाटक सरकारने हरियाणा व राजस्थानच्या नागरिकांना त्यांच्या राज्यात सोडण्यासाठी खास एसटीची व्यवस्था केली.
विजयपूरचे जिल्हाधिकारी वाय. एस. पाटील, जिल्हा पोलीस प्रमुख अनुपम अग्रवाल व इतर अधिकाऱ्यांनी आज धुळखेड येथे ६२ बसेस पाठविल्या. सर्व बसच्या काचेवरती कोरोना आजाराचे स्टिकर लावण्यात आले होते.
कर्नाटकातून बसमधून काही नागरिक येणार असल्याची माहिती मिळताच सोलापूरच्या प्रांताधिकारी ज्योती पाटील, मंद्रूपच्या तहसीलदार उज्वला सोरटे व पोलीस अधिकारी टाकळी येथे गेले. यावेळी महाराष्ट्राच्या हद्दीतून कर्नाटकात जाणाऱ्यांना तिकडे घेतले जात नव्हते. ही गोष्ट कर्नाटक प्रशासनाच्या लक्षात आणून देण्यात आली. महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणाऱ्यांना स्वीकारले तर तुमच्या एसटी बस महाराष्ट्रातून जातील असे बजावले. हे मान्य केल्यानंतर आज सकाळी ११ वाजता २ हजार ४३४ नागरिकांना घेऊन ६२ एसटी बस राजस्थान व हरियाणा राज्यात जाण्यासाठी महाराष्ट्राच्या हद्दीतून पाठवल्या. नांदणी येथील चेक पोस्टवर तपासून या सर्व एसटी मंद्रूप- मोहोळ मार्गे राजस्थानकडे रवाना झाल्या.
खबरदारी कोण घेणार ?
राज्यात संचारबंदी असल्याने एकही खाजगी व सरकारी वाहन रस्त्यावरून धावत नाही. मात्र कर्नाटकच्या आज ६२ बसेस राज्यातून जात आहेत. सर्व बसेसवर कोरोनाचे स्टिकर आहे. अडीच हजार लोकांपैकी काहीजण वाटेत कुठे थांबले तर. एखाद्याला कोरोनाचा संसर्ग झाला असेल तर त्याची खबरदारी कशी घेणार. हा गंभीर प्रश्न महाराष्ट्राच्या हद्दीतून जाईपर्यंत असणार आहे.
Post a Comment