कोरोना ; प्रशासनाकडून प्रभावी उपाययोजना; नियंत्रण कक्ष सज्ज
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - संपूर्ण देशात लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर त्याची प्रभावी अंमलबजावणी जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासनाने सुरू केली आहे. कोणत्याही परिस्थितीत अनावश्यकरित्या नागरिक घराबाहेर येणार नाहीत याची दक्षता घेतली जात आहे. नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. भाजीपाला विक्री फेरीद्वारे करण्याचे तसेच किराणा दुकान समोर दोन व्यक्तींमध्ये अंतर राहील अशा पद्धतीने बऱ्याच ठिकाणी नियोजन केले असून पोल्ट्री आणि पशुखाद्य दुकाने सुरू राहतील अशा सूचना दिल्याचे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी सांगितले.
नागरिक आज सकाळीच विविध ठिकाणी जीवनावश्यक वस्तू घेण्यासाठी घराबाहेर येत होते तेव्हा संबंधित दुकानासमोर त्या दोन व्यक्तींमध्ये किमान अंतर राहील याची काळजी दुकानदारांकडून घेतली जात होती. ज्या ठिकाणी या निर्देशांचे पालन होत नसल्याचे निदर्शनास आले तेथील दुकानदारांना तेथील नगरपालिका तसेच ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने समज दिली गेली.
किराणा विक्री करणाऱ्या दुकानदारांनी घरपोच किराणा देता येईल का याबाबत नियोजन करावे तसेच नागरिकांनीही त्यात सोसायटीतील किंवा एकाच परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी त्यांची मागणी संबंधित दुकानदाराकडे नोंदवली तर घरपोच किराणामाल पोहोचणे शक्य आहे. तसे नियोजन स्थानिक स्तरावर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
अत्यावश्यक सेवा वस्तू व पुरवठा आणि त्यांची वाहतूक याबाबत नागरिकांना कोणतीही तक्रार असल्यास त्याची सोडवणूक करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय येथे २४*७ कार्यरत नियंत्रण कक्ष स्थापित केला आहे. तेथे उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्याची तेथे नियंत्रण अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली असून नागरिकांना या 0241-2323844 /0241-2343600. टोल फ्री क्रमांक 1077 क्रमांकावर संपर्क साधता येणार आहे.
Post a Comment