दुकाने बंदचा आदेश /कोरोनाने आवळल्या आर्थिक नाड्या, बाजारपेठ ठप्प



माय अहमदनगर वेब टीम
मुंबई- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी कोरोना संसर्ग रोखण्यासाठी राज्यातील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व कार्यालये, दुकाने ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे निर्देश दिलेले आहेत. एकीकडे मंदीत असलेली अर्थव्यवस्था सुरळीत होण्याची स्वप्ने पाहणाऱ्या व्यावसायिकांपुढे या निर्देशामुळे आणखी मोठे संकट उभे राहिले आहे. व्यावसायिक क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते जीवनावश्यक वस्तूंच्या सेवा वगळता बाकी सर्व बंद असल्याने रोज जवळजवळ एक हजार कोटी रुपयांचे नुकसान होणार आहे.

अत्यावश्यक सेवा वगळता अन्य सर्व कार्यालयांतील कर्मचाऱ्यांना घरीच थांबण्यास सांगण्यात आले आहे. अन्नधान्याचा पुरेसा साठा असल्याने त्याची चिंता करण्याचे कारण नाही, असेही पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. डी मार्ट, रिलायन्स फ्रेश, स्टार बाजार यांनी मालाचा तुटवडा नसल्याचे जाहीर केले असून स्टार बाजारने आता होम डिलिव्हरीही सुरू केली आहे. ३१ मार्चपर्यंत या उद्योगाचा टर्नओव्हर अडीच ते तीन हजार कोटी रुपयांपर्यंत जाईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

कोरोनामुळे ट्रॅव्हल्सचा व्यवसाय बंद करण्यात आला असल्याने बस वाहतूकदारांचे दिवसाला १५० कोटी रुपयांचे नुकसान होत असल्याची माहिती बस वाहतूक संघटनेचे सचिव मलिक पटेल यांनी दिली. अशीच परिस्थिती हॉटेल उद्योगांचीही असून फाइव्ह स्टार हॉटेलपासून छोट्या हॉटेलपर्यंत ग्राहक जात नसल्याने दिवसाला १०० कोटी रुपयांचे नुकसान होत असल्याचे सांगितले जात आहे. एअरलाइन्स कंपन्यांनाही मोठे नुकसान होत असल्याने सरकारने मदत द्यावी, अशी मागणी केली जात आहे. रिक्षा आणि टॅक्सी चालकांपुढेही प्रवासी नसल्याने मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. रिक्षाचालक प्रत्येक दिवशी सर्व खर्च वजा जाता ४०० रुपये आणि टॅक्सी चालक ५०० ते ६०० रुपये घेऊन जातो. परंतु आता ३१ मार्चपर्यंत ग्राहक मिळण्याची शक्यता नसल्याने त्यांच्यापुढेही घर चालवण्याचे आव्हान आहे.

नोकरदारांना ३१ मार्चपर्यंत पगारी रजा द्यावी, असे निर्देश राज्य सरकारने दिले असल्याने त्यांच्यावर फार मोठा परिणाम होणार नसल्याचे दिसत आहे. सर्व कामकाज ठप्प होणार असल्याने रोजंदारीवर काम करणाऱ्यांपुढे मोठा प्रश्न उभा राहिला आहे. मुंबईत पोट भरण्यासाठी अन्य राज्यांतून आलेले अनेक कामगार आता पुन्हा आपल्या गावी जाण्यास निघाले आहेत. मॉल बंद असल्याने तेथील कामगारांवरही उपासमारीची वेळ आली आहे. अशीच परिस्थिती मनोरंजन उद्योगात पडद्यामागे काम करणाऱ्या कलाकारांवरआली आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post