दिल्ली - कोरोना संसर्ग विषाणूची परिस्थिती पाहता सध्याचे लॉकडाऊन कायम राहणार आहे. हे लॉकडाऊन ३ मे पर्यंत राहणार आहे, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करून पंतप्रधान मोदी यांनी आज सकाळी देशाला संबोधित केले. केंद्र सरकारने जाहीर केलेला लॉकडाऊनचा २१ दिवसाचा कार्यकाळ आज संपत आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी नेमकी काय घोषणा करतात याकडे देशाचे लक्ष होते. त्यानुसार मोदी यांनी आज लॉकडाऊनचा कार्यकाळ ३ मेपर्यंत राहील, असे आपल्या भाषणातून स्पष्ट केले.
मोदी म्हणाले, आतापर्यंत आपण खूप मोठे नुकसान टाळले आहे. लोकांनी खूप कष्ट सहन करून हे सर्व लॉकडाऊन यशस्वी केले आहे, याची मला जाणीव आहे. भारत भरपूर ताकदीने लढा देतो आहे. इतर देशांच्या तुलनेत भारताने कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी सर्वोत्तम प्रयत्न केलेत. सर्व देशवासियांना मी नमन करतो. बाबासाहेबाना आपण दाखवलेला संयम आणि संकल्पशक्ती हीच सर्वात मोठी श्रद्धांजली आहे. मी बाबासाहेबाना देखील नमन करतो. इतर देशांशी तुलना करण्याची वेळ नाही, पण आपली स्थिती जगातील महासत्तांच्या तुलनेत आटोक्यात आहे. देशात अनेक भागात सण घरात साजरे केले जात आहेत हे खरंच कौतुकास्पद आहे. संपूर्ण जगात कोरोनाचा हाहाकार माजलेला असताना आपण जे धैर्य दाखवले याचे जगभरात कौतुक होत आहे."
भारतात कोरोना केस सापडण्याआधीच आपण परदेश सीमा बंद केल्या, समस्या वाढण्याची वेळ पहिली नाही. समस्या दिसताच ती थांबवण्याचा निर्णय घेतला. भारताने वेगवान निर्णय घेतले नसते, तर काय स्थिती असती, याची कल्पना करूनही अंगावर शहारे येतात. लॉकडाऊन आणि सोशल डिस्टन्सिंगचा मोठा लाभ, याची मोठी आर्थिक किंमत मोजावी लागली, पण जीवापुढे याचे मोल नाही. लॉकडाऊन च्या नियमात कोणत्याही प्रकारचा बदल नाही, आता जसे नियम आहेत तेच नियम सुरू राहतील, असेही मोदी यांनी सांगितले.
Post a Comment