नगरकरांसाठी दिलासादायक ; 'त्या' कोरोना बाधिताचा अहवाल निगेटिव्ह
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या वतीने पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू संस्थेकडे पाठविण्यात आलेल्या ०९ स्त्राव नमुन्यांचे अहवाल शुक्रवारी सकाळी प्राप्त झाले. हे सर्व अहवाल निगेटीव आले असून जिल्ह्यात कोरोना बाधित आढळलेल्या दुसर्या रुग्णाच्या १४ दिवसानंतर पाठविलेल्या स्त्राव चाचणी अहवालाचाही समावेश आहे. आज पुन्हा या रुग्णाचा दुसरा स्त्राव चाचणी नमुना तपासणीसाठी पाठविण्यात आला असून तो निगेटीव आला तर त्याला घरी सोडण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप मुरंबीकर यांनी दिली. दरम्यान त्या कोरोना बाधिताचा अहवाल प्राप्त झाला असून तो निगेटिव्ह आला आहे.
दरम्यान, आज सायंकाळपर्यंत जिल्हा रुग्णालयाच्या वतीने ४७९ जणांचे अहवाल तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यातील १७ जणांचे अहवाल पॉझिटिव आले तर ४१९ जणांचे अहवाल निगेटीव आले आहेत. अद्याप ३७ स्त्राव नमुना चाचणीचे अहवाल येणे बाकी आहे. आतापर्यंत जिल्हा रुग्णालयात ४९४ जणांची तपासणी करण्यात आली असून ११० जणांना सध्या वैद्यकीय देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. एकूण ३८० जणांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे तर २४० व्यक्तींनी त्यांचा होम क्वारंटाईनचा कालावधी पूर्ण केल्याची माहिती डॉ. मुरंबीकर यांनी दिली.
सध्या सतरा बाधित रुग्णांपैकी १६ रुग्णांना बूथ हॉस्पिटल येथे ठेवण्यात आले असून तेथेच त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत. सर्वप्रथम बाधित आढळलेल्या रुग्णाची १४ आणि १५ व्या दिवशी करावयाची चाचणी निगेटीव आल्याने त्याला घरी सोडण्यात आले आहे. घरीच १४ दिवस त्या रुग्णाला होम क्वारंटाईन राहण्याचा सल्ला दिला असून नियमितपणे देखरेख करण्यात येत असल्याचे आरोग्य यंत्रणेने सांगितले.
याशिवाय, बाहेरुन आपल्या जिल्ह्यात आलेल्या व्यक्तींनाही होम क्वारंटाईनचा सल्ला देण्यात आला आहे. कोणत्याही नागरिकांना या कोरोना आजाराची लक्षणे आढळून येत असतील तर तात्काळ त्यांनी वैद्यकीय उपचार घ्यावे, असे आवाहनही डॉ. मुरंबीकर यांनी केले आहे.
रात्री उशिरा 36 अहवाल प्राप्त झाले असून ते सर्व निगेटिव्ह आले असल्याचे जिल्हा माहिती कार्यालयातून देण्यात येत आहे.
Post a Comment