राज्यातील करोना बाधित रुग्णांची संख्या ४९० वर - आरोग्यमंत्री राजेश टोपे


माय अहमदनगर वेब टीम
मुंबई : राज्यात आज कोरोनाबाधित ६७ नवीन रुग्णांची नोंद झाली. त्यातील ४३ रुग्ण मुंबई येथील असून १० रुग्ण मुंबई परिसरातील आहेत.आजच्या बाधित रुग्णांमध्ये पुणे येथील ९ तर अहमदनगर जिल्ह्यातील ३ रुग्णांचा समावेश आहे. याशिवाय वाशिम आणि रत्नागिरी येथे प्रत्येकी एका रुग्णांची नोंद झालेली आहे. यामुळे राज्यातील करोना बाधित रुग्णांची संख्या ४९० झाली आहे,अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

आज राज्यात ६ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी प्रत्येकी १ रुग्ण वसई विरार, बदलापूर ठाणे, जळगाव, पुणे येथील आणि २ जण मुंबई येथील आहेत.

या ६ रुग्णांचे तपशील पुढीलप्रमाणे आहेत -

१) वसई विरार येथे मृत्यू झालेला ६८ वर्षीय पुरुष हा दिनांक २९ मार्च २०२० रोजी येथील एका खाजगी रुग्णालयात भरती झालेला होता. त्याचा भाचा फेब्रुवारीच्या पहिल्या आठ्वडयात अमेरिकेहून आला होता पण भाच्याला कोणतीही लक्षणे नव्हती. या रुग्णास मधुमेह होता.

२) बदलापूर ठाणे येथे मृत्यू झालेली महिला ही एका खाजगी रुग्णालयात भरती होती. मधुमेह, उच्च रक्तदाब, मेंदूत रक्तस्त्राव, मणक्याचे फ्रॅक्चर असलेली ही महिला बराच काळापासून बिछान्याला खिळून होती. त्यामुळे तिला बेडसोर देखील झालेले होते. तिचा कोणत्याही प्रदेशी प्रवासाचा इतिहास नव्हता.

३) जळगाव येथे मृत्यू झालेला ६३ वर्षीय पुरुष हा जळगाव मधील करोना बाधित रुग्णाचा सहवासित होता. त्याला मधुमेह, उच्च रक्तादाब होता आणि १ महिन्यापूर्वी त्याची ॲन्जिओप्लास्टी झाली होती. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जळगाव येथे त्याचा मृत्यू झाला.

४) पुणे येथील ससून हॉस्पिटलमध्ये मृत्यू पावलेली ५० वर्षीय महिला २८ मार्च रोजी भरती झाली होती. तिने परदेशात प्रवास केलेला नव्हता.

५) मुंबईच्या बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा सेंटरमध्ये मृत्यू पावलेला ६५ वर्षीय पुरुष हा मूत्रपिंडाच्या व्याधीचा जुना रुग्ण होता. त्याने कोठेही प्रदेश प्रवास केलेला नव्हता.

६) मुंबईतील राजावाडी रुग्णालयात एका ६२ वर्षाच्या मधुमेही रुग्णाचा मृत्यू झाला.

कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता २६ झाली आहे.

*राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय पॉझीटिव्ह आढळलेल्या रुग्णांचा तपशील* :-

मुंबई २७८

पुणे ( शहर व ग्रामीण भाग ) ७०

सांगली २५

मुंबई वगळून ठाणे मंडळातील मनपा ५५

नागपूर १६

यवतमाळ ४

अहमदनगर २०

बुलढाणा ५

सातारा, औरंगाबाद प्रत्येकी ३

कोल्हापूर, रत्नागिरी प्रत्येकी २

सिंधुदुर्ग, गोंदिया, जळगाव, नाशिक, उस्मानाबाद प्रत्येकी १

इतर राज्य - गुजरात १

*एकूण ४९० त्यापैकी ५० जणांना घरी सोडले तर २६ जणांचा मृत्यू*

राज्यात आज एकूण ५९५ जण विविध रुग्णालयात भरती झाले आहेत. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १२ हजार ८५८ नमुन्यांपैकी ११ हजार ९६८ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर ४९० जण पॉझिटिव्ह आले आहेत. आतापर्यंत ५० करोना बाधित रुग्णांना ते बरे झाल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.

सध्या राज्यात ३८ हजार ३९८ व्यक्ती घरगुती अलगीकरणात असून ३०७२ जण संस्थात्मक क्वारंटाईन मध्ये आहेत.

निजामुद्दीन येथील बंगलेवाली मशीदीत मार्च महिन्याच्या सुरुवातीच्या काळात झालेल्या धार्मिक कार्यक्रमात राज्यातील ज्या नागरिकांनी भाग घेतला होता त्यांचा सर्व जिल्हा आणि महानगरपालिका स्तरावर कसून शोध घेण्यात येत आहे. आतापर्यंत प्राप्त १२२५ व्यक्तींच्या यादीपैकी १०३३ व्यक्तींशी संपर्क झाला असून त्यापैकी ७३८ जणांना विलगीकरण कक्षात भरती करण्यात आले आहे. आतापर्यंत राज्यात या व्यक्तींपैकी ७ जण करोना बाधित आढळले आहेत. यापैकी प्रत्येकी २ जण पुणे ,पिंपरी चिंचवड आणि अहमदनगर भागातील आहेत तर एक जण हिंगोलीतील आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post