अक्षयतृतीयेनिमित्त श्री विशाल गणेश चरणी 1100 आंबे अर्पण


गरजूंना मदत करुन श्री विशाल गणेशाप्रती भक्ती समर्पित करावी - अ‍ॅड. अभय आगरकर
माय अहमदनगर वेब टीम
अहमदनगर - शहराचे ग्रामदैवत असलेल्या श्री विशाल गणेशावर अनेक भाविकांची श्रद्धा आहे. त्यामुळे अनेक भक्त नियमित देवदर्शनासाठी येत असतात, परंतु सध्या संपूर्ण देशात लॉकडाऊन केले असल्याने श्री विशाल गणेश मंदिर भाविकांसाठी बंद करण्यात आले आहे. मंदिर बंद असले तरी शासनाच्या नियमांचे पालन करुन नित्यनियमाने पूजा-आर्चा सुरु आहे. आज अक्षयतृतीनिमित्त श्री विशाल गणेश मंदिरात पुजारी संगमनाथ महाराज यांच्या हस्ते विधीवत पूजा करुन श्री विशाल गणेशाश 1100 आंब्यांचा नवैद्य दाखविण्यात आला.

यानिमित्त अध्यक्ष अ‍ॅड. अभय आगरकर म्हणाले, प्रत्येक सणाच्या मागे एक विचार आहे. हिंदू संस्कृती विचारानुसार अक्षय तृतीयेच्या दिवशी भूकेलेल्याला अन्न, तहानलेल्याला पाणी, वस्त्रहीन व्यक्तीला वस्त्र अशा प्रकारे दानधर्म केल्यास पुण्य गाठीशी जमा होऊन मोक्षाचा मार्ग खुला होतो. हा दिवस खर्‍या अर्थाने कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. आपल्याला मनुष्य देहाच दान मिळालेले आहे. म्हणूनच अक्षयतृतीयेच्या दिवशी पितरांच्या स्मरणार्थ अन्नदान, वस्त्रदान, जलदान करण्यात येते. हीच भावना व संस्कृती जपण्याची वेळ आली आहे. सध्या लॉकडाऊनमुळे अनेक गोर-गरीब व सर्वसामान्यांवर उपासमारीची वेळ आली आहे, तेव्हा अशा लोकांना मदत करुन दिवसाचे पुण्य मिळवावे. आपआपल्या भागातील गरजूंना मदतीचा हात देऊन त्यांच्या जीवनात आशेचा किरण निर्माण करण्याचे काम प्रत्येकाने करावे. देवस्थानच्यावतीनेही पंतप्रधान सहाय्यता निधी व मुख्यमंत्री सहाय्यता निधीस मदत करण्यात आली आहे. श्री विशाल चरणी विविध प्रकारचे दान करणार्‍यांची संख्या मोठी आहे, अशा व्यक्तींनीही गरजूंना मदत करुन श्री विशाल गणेशाप्रती भक्ती समर्पित करावी, असे आवाहन विश्‍वस्तांच्यावतीने अध्यक्ष अ‍ॅड.आगरकर यांनी केले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post