मुंबई - राज्यातील काेरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. सर्वात भीषण परिस्थिती मुंबईत आणि पुण्यात निर्माण झाली आहे. यामुळे कोरोनाचा प्रसार थांबवण्यासाठी मुंबई महानगर क्षेत्र आणि पुणे महानगर क्षेत्रासाठी लॉकडाऊनमध्ये दिलेली शिथिलता रद्द करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी घेतला. तसेच या क्षेत्रात अधिक काटेकोरपणे लॉकडाऊन पाळले जावे, असे प्रशासनाला निर्देश दिले आहेत. २० एप्रिलपासून लॉकडाऊनच्या बाबतीत काही प्रमाणात शिथिलता आणण्याचे राज्य सरकारने ठरवल्यानंतर नागरिकांनी मुक्तपणे व्यवहार सुरू केले होते. त्यामुळेच मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतला आहे.
लॉकडाऊनसंदर्भात राज्य शासनाने १७ एप्रिल रोजी काढलेल्या सर्वसमावेशक अधिसूचनेतील नव्याने शिथिल केलेल्या बाबी रद्द करणारी दुरुस्ती मंगळवारी करण्यात आली असून मुंबई महानगर आणि पुणे महानगर क्षेत्रासाठी ती लागू असेल. म्हणजेच १७ एप्रिलला सुधारित अधिसूचनेपूर्वीची परिस्थिती मुंबई महानगर आणि पुणे महानगरसाठी लागू राहील. उर्वरित राज्यात १७ एप्रिलप्रमाणे शिथिलता लागू राहणार आहे.
Post a Comment